नवी दिल्ली - नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांशी कॅमेराच्या टेहळणीविना एकांतात भेट घेऊ देण्यास पाकिस्तान तयार नाही. त्यामुळे तशी परवानगी मिळावी म्हणून भारतपाकिस्तानविरोधात पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात कायदेशीर लढा देण्याची शक्यता आहे. जाधव यांना शुक्रवारी भेटण्यासाठी भारत वकिलातीच्या अधिकाऱ्यांना परवानगी दिल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. मात्र, एकांतात जाधव यांची भेट घेता येणार नाही, अशी अट पाकिस्तानने घातल्याने तो प्रस्ताव भारताने धुडकावून लावला होता. त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. कॅमेरा तसेच संभाषण ध्वनिमुद्रित करणारे उपकरण न बसविलेल्या ठिकाणी एकांतात जाधव यांची भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांना भेट घेण्याची पाकिस्तानने परवानगी द्यावी यासाठी भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय निकषानुसार सर्व देशांतील तुरुंगात आता कॅमेरे व ऑडिओ रेकॉर्डिंग उपकरणे बसविण्यात आली आहेत, असा युक्तिवाद पाकिस्तानकडून होण्याची शक्यता आहे.
कुलभूषण जाधव यांना स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार मिळावा यासाठी वकिलातीच्या अधिकाऱ्यांशी त्यांची भेट होणं गरजेचे आहे. हा मुद्दा भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टातही हिरीरीने मांडला होता.