'चीनची युद्धाची खुमखुमी जीरवायची रणनिती आता भारताने आखायलाच हवी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 08:23 AM2021-12-03T08:23:56+5:302021-12-03T08:30:31+5:30
चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी देशात 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यावरुन, शिवसेनेनं देशातील राज्यकर्त्यांना गंभीरतेचा इशारा दिला आहे.
चीन - लडाखच्या सीमारेषेवर गेल्या काही वर्षांपासून चीन आणि भारत यांच्यातील संबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे. गलवान घाटीत चीन आणि भारतीय सैन्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच भारतीय सैन्याचे अनेक जवान शहीद झाले होते. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखला जाऊन भाषण करताना चीनला ठणकावले होते. आता, चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी देशात 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यावरुन, शिवसेनेनं देशातील राज्यकर्त्यांना गंभीरतेचा इशारा दिला आहे. चीनही ही घोषणा हलक्यात न घेण्याचेही शिवसेनेनं सूचवलं आहे.
युद्धासाठी पुढाकार घेण्याची आणि त्यासाठी 3 लाख तरुण सैनिकांची भरती करण्याची चीनची घोषणा म्हणजे हवेतला गोळीबार समजण्याची चूक न करता त्यामागचे धोके जगाने आणि खास करून आपल्या राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजेत, असे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून संपादक संजय राऊत यांनी म्हटलंय. तसेच, सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश यांसारख्या सीमेवरील भागांत चीनने वारंवार चालविलेली घुसखोरी आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी वापरलेली युद्धखोरीची भाषा याचा संबंध पडताळून पाहवाच लागेल. चीनला युद्धाची खुमखुमी कायमच असते, ती कशी जिरवायची याची रणनीती आता हिंदुस्थानलाही आखावीच लागेल, अशा शब्दात शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारला सूचनावजा सल्ला दिला आहे.
चीनची युद्धखोर नीती डोकेदुखीच
चीनला लागलेली साम्राज्यवादाची राक्षसी चटक हा सध्या जगभरासाठी चिंतेचा विषय बनला आहे. चीनचा एकूणच सगळा गोपनीय कारभार, लपूनछपून आखलेली धोरणे आणि कट-कारस्थानांवर आधारित कावेबाज परराष्ट्र धोरण यामुळे जगभरातील तमाम देश चीनकडे कायम संशयानेच पाहत असतात. बाकी जगाचे सोडा, पण चीनची ही युद्धखोर नीती हिंदुस्थानसाठी सदैव डोकेदुखीच ठरली आहे. शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तर चीनच्या युद्धखोर कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायम गुरगुरत राहणे आणि दंडाच्या बेडक्या फुगवून शक्तिप्रदर्शन करणे, ही चीनची जुनी खोड आहे. आताही चीनने तेच केल्याचं राऊत यांनी म्हटलंय.
शी जीनपींग यांच्या भाषणाचा निषेध का नाही
'चिनी लष्कराची उच्च गुणवत्ता, इतर देशांसोबतची लष्करी स्पर्धा जिंकणे आणि भविष्यातील युद्धांमध्ये पुढाकार घेणे, ही चिनी सशस्त्री दलांच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे.' चिनी राष्ट्राध्यक्षांचे हे वक्तव्य म्हणा किंवा दर्पोक्ती हिंदुस्थानच नव्हे तर जगभरातील देशांनी नीट समजून घेतली पाहिजे. चीनने साऱ्या जगाला उद्देशून युद्धाची भाषा केल्याचे शिवसेनेनं निदर्शनास आणून दिले आहे. चीनवर युद्ध लादले तर प्रत्युत्तर देऊ, अशी जर-तरची भाषा न वापरता थेट 'भविष्यात चीन युद्धासाठी पुढाकार घेईल,' अशी घोषणाच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी केल्याचे शिवसेनेनं म्हटलंय. विशेष म्हणजे आश्चर्य असे की, जगातील एकाही देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी अथवा परराष्ट्रमंत्र्यांनी चीन राष्ट्राध्यक्षांच्या या युद्धखोर भाषेचा साधा निषेधही नोंदविला नसल्याची खंतही राऊत यांनी व्यक्त केली.