सध्या भारतासह शेजारील काही देशही भीषण उष्णतेचा सामना करत आहे. मात्र महिनाभरानंतर या सर्वच देशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी, दक्षिण आशियातील बहुतेक भागांमध्ये नैऋत्य मान्सूनचा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमने (SASCOF) मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली.
एसएएससीओएफने म्हटल्यानुसार, ‘‘2024 च्या नैऋत्य मान्सून (जून-सप्टेंबर) हंगामात दक्षिण आशियातील उत्तर, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागातील काही भाग वगळता दक्षिण आशियातील बहुतांश भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे." दक्षिण आशियामध्ये भारताशिवाय, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका असे देश येतात.
मान्सूनच्या पहिल्या अर्ध्या भागात ‘अल निनो-सदर्न ऑसिलेशन’ची तटस्थ स्थिती निर्माण होऊ शकते. यानंतर, उत्तरार्धात एल निना परिस्थिती उद्भवू शकते. भारतीय हवामान विभागाने (IMD) या महिन्याच्या सुरुवातीलाच, भारतात मान्सूनच्या हंगामात पाऊस सामान्यपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली होती.