नवी दिल्ली: दहशतवादासंदर्भातील चीनची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. अलीकडेच भारत, चीन आणि रशिया या देशांमध्ये झालेल्या एका बैठकीनंतर चीनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांची नावे हटवण्यात आल्याचे निदर्शनात आले. या दोन्ही संघटनांवर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने बंदी घातलेली आहे. मात्र, आता रशियात होणाऱ्या एका संमेलनात चीन आणि पाकिस्तानची दुटप्पी भूमिका जगसमोर आणण्यासाठी भारताने रणनीती आखली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लामदिमिर पुतिन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी भारतीय अधिकारी या रणनीतीवर काम करत आहेत. पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या आणि मदत पुरवल्या जाणाऱ्या दहशवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्यावरही काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने नेहमीच भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवाया, हल्ले याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे दोन्ही देश दहशवादी संघटनेसंदर्भात रणनीती तयार करू शकेल, असे सांगितले जात आहे.
पुतिन आणि मोदी यांची भेट होणार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट होणार आहे. पुतिन सुमारे सहा तास भारतात असतील. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट रशियाच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी होणार आहे. कोरोना संकटाच्या परिस्थितीमुळे पुतिन अधिक वेळ परदेशात थांबणार असून, कोरोना कालावधीत पुतिन केवळ दोन वेळा रशियाच्या बाहेर पडले आहेत.
अफगाणिस्तान आणि चीनवर चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये चीन आणि अफगाणिस्तान यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना चीन पाठिशी घालत असलेला मुद्दाही या बैठकीत भारताकडून उपस्थित केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.