नवी दिल्ली – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शुक्रवारी ईडीनं मोठी कारवाई करत चेन्नईतून एक हेलिकॉप्टर जप्त केले. हे हेलिकॉप्टरही अमेरिकेच्या सांगण्यावरुन जप्त केल्याची माहिती पुढे येत आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तपास यंत्रणांना केलेल्या विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली. चेन्नईतून BELL 214 हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर हामीद इब्राहिम आणि अब्दुला व्यक्तीच्या नावावर आहे. ज्याला अमेरिकेच्या AAR Corporation कंपनीकडून इंपोर्ट करण्यात आलं होतं. थायलँडहून या BELL 214 हेलिकॉप्टरनं भारतात प्रवेश केला. त्यानंतर चेन्नईतील J Matadee Free Trade Warehouse Zone मध्ये ते ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाचा आरोप आहे की, BELL 214 हेलिकॉप्टरचा वापर आरोपींनी बंदी असलेल्या देशात केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आता आरोपींनी हेलिकॉप्टर भारतात आणलं आणि चेन्नई येथे लपवण्यात आलं. त्यामुळे भारताच्या ईडीने अमेरिकेच्या सांगण्यावरुन त्यांच्या पातळीवर चौकशी करत हेलिकॉप्टर ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर जारी केलेल्या निवेदनात ईडीने सांगितले की, हेलिकॉप्टर एका वेअरहाऊसमध्ये ठेवलं होतं. त्या गोदामला दर महिन्याला भाडे दिले जात होते. हेलिकॉप्टर जप्त केले तेव्हा ते Dismantle कंडिशनमध्ये होते. त्याचे काही भाग वेगवेगळे केले होते.
भारतानं अमेरिकेची मदत का केली?
माहितीनुसार, भारतानं अमेरिकेची मदत यासाठी केली कारण दोन्ही देशांमध्ये तसा करार झाला होता. Mutual Legal Assistance Treaty च्या माध्यमातून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताला BELL 214 हेलिकॉप्टर जप्त करण्याचं आवाहन केले होते. भारत हा कराराचं पालन करतो त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी ईडीच्या माध्यमातून हेलिकॉप्टर जप्त करण्याची कारवाई केली आहे. चेन्नईमध्ये वेअरहाऊसवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला त्यानंतर हेलिकॉप्टर जप्त करण्यात आलं आहे. कारवाई झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कारवाईची माहिती अमेरिकेला कळवली आहे. त्यामुळे आता यापुढील कारवाई अमेरिकेकडून केली जाणार आहे.