नवी दिल्ली :ट्विटरच्या लोकेशन सेटिंग्जमध्ये भारताचा भूभाग असलेले लेह हे ठिकाण चीनमध्ये असल्याचे दाखवण्यात आल्याबद्दल भारत सरकारने या आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची अत्यंत कठोर शब्दांत कानउघाडणी केली आहे. या घोडचुकीमुळे तुमच्याच विश्वासार्हता आणि नि:पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, या शब्दात भारताने ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांना लिहिलेल्या एका पत्रात सुनावले आहे.
या घडामोडीची कल्पना असलेल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव अजय साहनी यांनी डॉर्सी यांना लिहिलेल्या पत्रात भारताची नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली आहे.
पत्रकाराने आणून दिला प्रकार निदर्शनासट्विटरचा हा खोडसाळपणा सर्वप्रथम एका पत्रकाराच्या निदर्शनास आला. हा ज्येष्ठ पत्रकार लेहमधून १८ आॅक्टोबर रोजी ट्विटर लाईव्ह करीत असताना अचानक त्याच्या निदर्शनास आले की, लेह हे ठिकाण चीनमध्ये दाखवण्यात येत आहे. त्याने लगेच ही बाब केंद्र सरकारला कळवली.