भारताला अमेरिकेकडून मिळणार 'रोमियो', चीन-पाकशी सामना करण्यासाठी ठरणार मदतगार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:02 AM2020-02-13T11:02:20+5:302020-02-13T11:03:13+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.
नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारतीय लोकांशी मजबूत आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा या दौऱ्याचा मानस आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी आणि संरक्षण कराराला अंतिम स्वरूप दिलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यापूर्वीच अमेरिकेची संरक्षण संस्था लॉकहीड मार्टिनकडून 2.6 अब्ज डॉलर्समध्ये 24 एमएच -60 आर सीहॉक हेलिकॉप्टर खरेदीस मान्यता देण्याच्या विचारात आहेत. हा पूर्ण करार 3.5 बिलियन डॉलर(25,000 कोटी रुपये)चा आहे. ज्यात 30 हेवी ड्युटी सशस्त्र हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे.
नौदलासाठी 24 एमएच-60 'रोमियो' सीहॉक मेरिटाइम मल्टी-मिशन हेलिकॉप्टर्सच्या 2.6 बिलियन डॉलरचा आणि लष्करासाठी 6 एएच -64 ई अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्ससाठी 930 मिलियन डॉलर करार होणार आहे. या हेलिकॉप्टर्सला अमेरिकेची कंपनी लॉकहीड मार्टिनकडून खरेदी केली जाणार आहेत. अमेरिकेनं गेल्या वर्षीच भारताला सीहॉक हेलिकॉप्टर विकण्यास मंजुरी दिलेली होती. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात हा करार प्रत्यक्षात उतरणार आहे. ही हेलिकॉप्टर्स सी किंग हेलिकॉप्टर्सची जागा घेणार आहेत. हिंद महासागरात चीनचं वाढत असलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारताला या हेलिकॉप्टर्सची आवश्यकता आहे.
या करारानंतर भारताच्या नौदलाला आणखी ताकद मिळणार आहे. चार ते पाच वर्षांच्या आत सर्वच हेलिकॉप्टर्स भारताच्या ताब्यात येणार आहेत. या करारांतर्गत भारत MH- 60R हेलिकॉप्टर्सचत्या पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 15 टक्के रक्कम देणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राबर्ट लाइटहायझर यांच्यात काही आठवड्यापूर्वी फोनवर बातचीत झाली होती. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासंबंधी बोलणंही झालं होतं.