विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 01:35 PM2018-06-19T13:35:00+5:302018-06-19T13:35:00+5:30

गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे.

india voted against maldives | विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने असा शिकवला धडा 

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताने अद्दल घडवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यत्वासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मालदीवऐवजी इंडोनेशियाला मत दिले. तसेच हिंदी महासागरातील आपल्या शेजारी देशाला अधिक मते मिळणार नाहीत, याची खबरदारी घेतल्याचे समोर आले आहे. 
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील हंगामी सदस्यांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत भारताने आपल्यालाच मतदान केल्याचा दावा मालदीवकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात  भारताने इंडोनेशियाला मदत केल्याचे राजकीय सूत्रांनी म्हटले आहे. भारताने केलेल्या मदतीमुळे स्थायी समितीच्या हंगामी सदस्यत्वाच्या निवडणुकीत आशिया-पॅसिफिक विभागातून इंडोनेशियाने मोठ्या फरकाने विजय मिळवला.  8 जूनला झालेल्या या निवडणुकीत इंडोनेशियाच्या बाजूने 144 देशांनी मतदान केले. तर मालदिवला केवळ 46 देशांनी पाठिंबा दिला. 
भारताने इंडोनेशियाला मतदान करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेक देशांनी मालदीवला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे 60 देशांचा लेखी पाठिंबा असून 30 हून अधिक देशांनी तोंडी समर्थन दिल्याचा दावा मालदिवने केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना फारच कमी मते मिळाली. 
भारत आणि मालदीवमधील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनले आहेत. त्यातच मालदीव सरकारकडून विविध मुद्द्यांवर भारताला डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे  भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे भारतीय हितसंबंधांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या मालदिवविरोधातील पहिली दंडात्मक कारवाई मानली जात आहे. राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या कारकीर्दीत हिंदी महासागरामध्ये मालदीव हा भारताच्या संरक्षण हितसंबंधांच्या विरोधात काम करत आहे. तसेच भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टरही जूव महिन्याच्या अखेरीपर्यंत परत घेऊन जाण्याचे निर्देश मालदीवने दिले होते. तसेच भारतीयांना देण्यात येणाऱ्या काम करण्याच्या परवान्यांना स्थगिती देण्याचे आदेशही आपल्या अधिकाऱ्यांना दिले होते. 
गेल्याच आठवड्यात भारताने मालदीवमधील राजकीय परिस्थितीबाबतचे आपले मौन सोडताना कोणतीही सुनावणी न करता राजकीय कैद्यांना शिक्षा सुनावल्याने यामीन सरकारवर टीका केली होती.   

Web Title: india voted against maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.