नवी दिल्ली- दहशतवाद्यांना निधीचा पुरवठा करण्याच्या प्रकरणात पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात आर्थिक कृती दला(FATF)नं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे. पॅरिसमध्ये सुरू असलेल्या FATFच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीत पाकिस्तानचं नाव टाकलं असून, हा नववा देश ठरला आहे. इथोपिया, सर्बिया, श्रीलंका, सीरिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो, ट्युनिशिया आणि यमन देशांचा या यादीमध्ये आधीपासूनच समावेश आहे.एफएटीएफच्या नुसार, जर या नऊ देशांनी दहशतवाद्यांना निधी पुरवणं आणि हवाला प्रकरणांवर कारवाई करण्यास कठोर पावलं न उचलल्यास आंतरराष्ट्रीय आर्थिक कृती दल त्यांना नुकसान पोहोचवू शकतं. आंतरसरकारी संस्था एफएटीएफचा अवैध देवाणघेवाणीवर बंदी घालण्याचा उद्देश आहे. जेणेकरून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याला आळा घालता येईल.एफएटीएफद्वारे पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या निर्णयाचं भारतानंही स्वागत केलं आहे. एफएटीएफच्या मानकांना पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानला दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखावा लागणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हाफिज सईद खुलेआम फिरतोय. लष्कर-ए-तय्यबा, जमात-उद-दावा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातून सक्रिय आहेत. त्यांच्या विरोधात पाकिस्ताननं कारवाई केली पाहिजे. एफएटीएफच्या ग्रे-लिस्ट समावेश झाल्यानंतर पाकिस्तान आता तरी दहशतवाद्यांवर कारवाई करेल, अशी आशाही भारतानं व्यक्त केली आहे.
टेरर फंडिंग प्रकरणात पाकला धक्का, FATFने टाकलं 'ग्रे लिस्ट'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 1:40 PM