नवी दिल्ली: येत्या तीन दशकांमध्ये भारत आणि नायजेरियाची लोकसंख्या अतिशय वेगानं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रानं अहवालात म्हटलं आहे. पुढील तीन दशकांमध्ये भारताची लोकसंख्या २७ कोटी ३० लाखांनी वाढेल. तर याच काळात नायजेरियाच्या लोकसंख्येत २० कोटींची भर पडेल, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रानं जागतिक लोकसंख्येबद्दल भाष्य करणारा अहवाल प्रकाशित केला आहे. सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून पहिल्या स्थानावर असेल, असं अहवाल सांगतो. पुढील तीन दशकांमध्ये जगाची लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल, असा अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.७ अब्ज इतकी असून २०५० पर्यंत ती ९.७ अब्जांवर जाऊन पोहोचेल, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात आहे. सध्या भारतातील तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या वेगानं वाढेल, असं विश्लेषण अहवालात करण्यात आलं आहे. भारत आणि नायजेरियामुळे जगाची लोकसंख्या झपाट्यानं वाढणार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतातील महिलांनी सरासरी १ किंवा २ मुलांना जन्म दिला तरीही लोकसंख्या वेगानं वाढेल. नायजेरियातील एक महिला सरासरी पाच मुलांना जन्म देते. त्यामुळे नायजेरियाची लोकसंख्या येत्या तीन दशकांमध्ये झपाट्यानं वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो.
२०२७ मध्ये 'चिनी कम'; भारत चीनला मागे टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:19 PM