नवी दिल्ली : भारतीय हवाई क्षेत्रासाठी सोमवारचा दिवस काहीसा खास असणार आहे. कारण जैवइंधनावर विमान उडणार आहे. स्पाईस जेटचे एक विमान जैवइंधनावर डेहराडून ते दिल्ली असा प्रवास करणार असून भारत जैवइंधनावर विमान उडविणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.
सोमवारी जैवइंधनावर प्रथम डेहराडूनवरच 10 मिनिटे विमान उडविले जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर दिल्लीला विमान नेण्यात येणार आहे. या चाचणीवेळी डीजीसीए, नागरी विमानोड्डाण मंत्रालय आणि विमान कंपनीचे अधिकारी हजर राहणार आहेत. जगातील पहिल्या जैवइंधनावर उड्डाण केलेल्या विमानाने यावर्षीच्या सुरुवातीलाच लॉस एंजेलिस ते मेलबर्न दरम्यान यशस्वी प्रवास केला होता.
जैवइंधन हे भाज्यांपासून बनविलेले तेल, रिसायकल केलेले ग्रीस, जणावरांची चरबी आदींपासून बनविले जाते. नेहमीच्या पेट्रोल, डिझेलच्या बदल्यात याचा वापर केला जाऊ शकतो. IATA ने ठेवलेल्या लक्ष्यानुसार 2050 पर्यंत 50 टक्के कार्बनचे उत्सर्जन कमी केले जाणार आहे. तर जैवइंधन वापरल्यास कार्बनचे उत्सर्जन 80 टक्के कमी होऊ शकते.
आता पर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकासारख्या विकसित देशांनी जैवइंधनावर विमान उडविले आहे. मात्र, विकसनशील देशांमध्ये भारत पहिला ठरणार आहे.