भारतीय हवाई दलासाठी 100 विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 1.25 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चेन्नईत होणाऱ्या डेफएक्स्पोच्या आधी ही प्रक्रिया सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच हवाई दलाची ताकद वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. यामध्ये अमेरिका, स्वीडन, फ्रान्स आणि युरोपीयन कंपन्यांचा समावेश असेल. डेफएक्स्पो सुरु होण्याआधी विमान कंपन्यांकडून याबद्दलची माहिती मागवण्याचा हवाई दलाचा प्रयत्न आहे. 11 एप्रिलपासून चेन्नईत डेफएक्स्पो सुरु होईल. या एस्क्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. शंभरपेक्षा अधिक लढाऊ विमानांची खरेदी करण्याचा हवाई दलाचा मानस आहे. यासोबतच मेक इन इंडियाला गती देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. परदेशी कंपन्यांच्या मदतीने भारतातच लढाऊ विमानांची उभारणी करण्याचा सरकारचा विचार आहे. हवाई दलाला लढाऊ विमानांची नितांत आवश्यकता असून याबद्दल तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे. त्यामुळेच विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपनीशी लवकरात लवकर करार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विमानांच्या कमतरतेमुळे हवाई दलाच्या युद्धसज्जतेवर विपरित परिणाम होताना दिसतो. त्यातच येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये हवाई दलातील मिग-21 आणि मिग-27 विमाने निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी तातडीने लढाऊ विमाने खरेदी करण्याची गरज आहे.
हवाई दलाचं सामर्थ्य वाढणार; 100 लढाऊ विमानांची खरेदी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 4:06 PM