भारतीय हवाई दलाचा 'मार्शल' काळाच्या पडद्याआड! अर्जन सिंग यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 03:49 AM2017-09-17T03:49:15+5:302017-09-17T03:54:08+5:30
भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आणि मार्शल आॅफ एअरफोर्स अर्जन सिंग (वय ९८ वर्षे) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर आर्मीज रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आणि मार्शल आॅफ एअरफोर्स अर्जन सिंग (वय ९८ वर्षे) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर आर्मीज रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामनण हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी हॉस्पिटलात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सिंग यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मोठी कामगिरी बजावली होती. त्यांना पाच रँक देऊ न फिल्डमार्शलचा दर्जा देण्यात आला होता. अनेक नेते व लष्करी अधिका-यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
जिवंतपणी श्रद्धांजली!
माजी लष्करप्रमुख व परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी अर्जन सिंग यांना जिवंतपणी श्रद्धांजली वाहिली! सिंग यांनी ट्विटची सुरुवात आत्म्यास शांती लाभो अशी केली. नंतर त्यांनी ट्विट डिलिट केले.
७० वर्षांची स्फूर्तिदायी कारकीर्द
भारतीय हवाई दलाचे पहिले आणि एकमेव मार्शल अर्जन सिंग यांनी आधी हवाई दलाचे प्रमुख म्हणून व नंतर राज्यपाल, प्रशासक व राजदूत म्हणून सुमारे ७० वर्षांच्या स्फूर्तिदायी कारकीर्दीत बहुमोल देशसेवा केली.
लष्करातील ‘फिल्ड मार्शल’शी समकक्ष असा हवाईदलाचे ‘मार्शल’ असा सर्वोच्च पंचतारांकित हुद्दा देऊन सरकारनेही या बहाद्दर योद्ध्याचे ऋण मान्य केले.
आॅगस्ट १९६४ मध्ये अर्जन सिंग हवाई दलाचे प्रमुख झाले, तेव्हा या दलातील सर्वात मोठा हुद्दा ‘एअर मार्शल’ असा होता. १९६५ मधील पाकिस्तानसोबतचे युद्ध जिंकण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने जी निर्णायक भूमिका बजावली, त्याबद्दल अर्जन सिंग यांना ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वोच्च नागरी बहुमान दिला गेला. तसेच हवाईदल प्रमुखाचा हुद्दा वाढवून तो ‘एअर चीफ मार्शल’ असा केला गेला. अशा प्रकारे अर्जन सिंग भारतीय हवाई दलाचे पहिले ‘एअर चीफ मार्शल’ झाले.
जानेवारी २००२ मध्ये सरकारने अर्जन सिंग यांना ‘मार्शल आॅफ एअर फोर्स’ हा सर्वोच्च हुद्दा निवृत्तीनंतर बहाल केला. या दर्जाचा सैन्यदलातील हुद्दा मिळालेले हवाई दलाचे अर्जन सिंग व लष्कराचे ‘फिल्ड मार्शल’ सॅम माणेकशा हे भारतातील फक्त दोनच अधिकारी आहेत.
गेल्याच वर्षी अर्जन सिंग यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त आसाममधील पनागढ हवाई तळाला ‘एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग’ असे नाव दिले गेले. जिवंत अधिका-याचे नाव हवाई तळाला दिले जाण्याची ही एकमेव घटना आहे.
हवाई दलातून सन १९६९ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरही सुमारे ४७ वर्षे अर्जन सिंग यांनी अनेक प्रकारे आपल्या सेवा देशाला दिल्या. ते स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत व केनियामधील उच्चायुक्त होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
- जन्म १५ एप्रिल १९१९, ल्यालपूर (आता पाकिस्तानात).
- कॉलेजमध्ये शिकत असतानाच वयाच्या १९ व्या वर्षी शाही ब्रिटिश हवाई दलात प्रशिक्षार्थी वैमानिक म्हणून निवड.
- हवाई दलात दाखल झाल्यावर पहिली कामगिरी वायव्य सरहद्द प्रांतात.
- जपानची मुसंडी रोखण्यासाठी झालेल्या आराकान मोहिमेत स्वाड्रन लीडर म्हणून सहभाग.
- पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या फौजांच्या रंगूनपर्यंतच्या मुसंडीत स्वाड्रन लीडर म्हणून मोलाची कामगिरी. त्याबद्दल विशेष पदकाने गौरव.
- भारत स्वतंत्र झाल्यावर १५ आॅगस्ट १९४७ रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनी हवाई दलाच्या १०० विमानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या ‘प्लायपास्ट’चे नेतृत्व.