Indian Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड, 'जैश'च्या २६३ जणांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:49 PM2019-03-11T13:49:13+5:302019-03-11T13:51:36+5:30
भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पाकिस्तान आणि काही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी या हल्ल्यात दहशतवादी ठार झाले नसल्याचा दावा केल्याने एअरस्ट्राइकच्या परिणामाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आला आहे. ज्यावेळी एअरस्ट्राइक झाली तेव्हा मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेचा तळ असलेल्या बालाकोटमधील जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती समोर आली आहे.
इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने या संदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकपूर्वी जाबा टॉप येथे 263 दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. तसेच बालाकोट येथे असलेल्या शिकाऊ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जैश ए मोहम्मदचे 18 टॉप कमांडरही तिथे उपस्थित होते, असेही या वृत्तात म्हटले आहे. बालाकोटमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांपैकी 83 दहशतवादी हे दौरा ए आम मधील होते. तर 91 दहशतवादी हे दौरा ए खास या गटातील होते. तर 25 दहशतवाद्यांना फिदायीन हल्ल्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या प्रचंड संतापाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केले होते. त्या हल्ल्यात जैशच्या तळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे तसेच मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र विविध वृत्तवाहिन्या आणि राजकीय व्यक्तींकडून ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत लढवण्यात येत असलेले तर्कवितर्क आणि पाकिस्तान तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांकडून येत असलेले परस्पर विरोधी दावे यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. तसेच भारतातील विरोधी पक्षातील राजकारण्यांकडूनही या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, आता या हल्ल्यात 263 दहशतवादी ठार झाल्याचे समोर आल्यानंतर बालाकोट येथील एअरस्ट्राइकवरून पुन्हा चर्चा आणि वाद रंगण्याची शक्यता आहे.