भारतातील निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या क्रूरकर्मा दहशतवाद्यांना पोसण्याचं काम पाकिस्तान करत असला, तरी आपलं युद्ध हे दहशतवाद्यांविरुद्ध आहे, याची पूर्ण जाणीव ठेवून पाकिस्तानी नागरिकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची खबरदारी घेत भारतीय लष्कराने आजची एअर स्ट्राइक मोहीम फत्ते केली. त्यांनी दाखवलेल्या या सुजाणपणामुळेच अख्खं जग सर्जिकल स्ट्राइक-२ नंतरही भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे आणि पाकिस्तानचं वस्त्रहरणही झालंय.
पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. लष्कराच्या मनातही असंतोष खदखदत होताच. पण, घाईघाईत कुठलंही चुकीचं पाऊल न उचलता, अत्यंत थंड डोक्याने दिवस-रात्र एक करून तिन्ही दलांनी एकत्रितपणे आखणी केली आणि आज भारताला मोठं यश मिळालं. मिराज 2000 या विमानांमधून १००० किलोचे बॉम्ब जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर टाकण्यात आले आणि मसूद अझरचा भाऊ, मेव्हण्यासह ३०० दहशतवादी मातीत गाडले गेले. पाकिस्तानने वारंवार आश्वासन देऊनही जैशचा बंदोबस्त न केल्यानं आणि त्यांच्याकडून आणखी दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यानंच हा हल्ला केल्याचं परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केलं. त्यावेळी, नागरी वसाहतीपासून दूर अंतरावर हे बॉम्ब टाकल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं. लष्कराच्या या मानवता धर्माला पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील.
पाकिस्तान सरकारचा भारताबद्दलचा, भारतीयांबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु, पाकिस्तानी नागरिकांशी आमचं कुठलंही वैर नाही, हे भारतीय लष्करानं आज कृतीतून दाखवून दिला. त्याला सलाम केला पाहिजे. कारण, एवढी मोठी कारवाई करताना प्रत्येक जवान हा स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो. अशावेळी, पाकिस्तानी नागरिकांच्या रक्षणाचा विचार प्राधान्याने करणं, हे निश्चितच स्तुत्य आहे. त्यांच्या या विचारामुळेच आज आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा भारताला मिळतोय. कारण आपलं युद्ध हे दहशतवादाविरुद्ध आहे, हे जगाला दिसतंय, पटतंय, जाणवतंय. याउलट, पाकिस्तान काय करतोय, त्यांचे इरादे किती नापाक आहेत, हेही सगळे पाहताहेत. या हवाई हल्ल्यांच्या निमित्ताने पाकिस्तान पुन्हा उघडा पडला आहे आणि त्याचं श्रेय लष्कराला जातं.