Indian Air Strike on Pakistan: ...अन् पाकिस्तानी नागरिकांनीच केला त्यांच्या सैन्याचा पोपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 06:23 PM2019-02-26T18:23:02+5:302019-02-26T18:26:26+5:30
पाकिस्तानी सैन्याचा दावा नागरिकांनीच खोटा ठरवला
इस्लामाबाद: भारतीय हवाई दलानंपाकिस्तानच्या हद्दीत घुसून 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानंजैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठी भागात हवाई दलानं 1000 किलोंचे बॉम्ब फेकले. भारताच्या या कारवाईनं नाक कापलं गेलं. मात्र पाकिस्तान याला हल्ला मानायला तयार नाही.
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानी हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्यानं केला. मात्र पाकिस्तानच्या या दाव्याची त्यांच्याच नागरिकांनी पोलखोल केली. मध्यरात्री तीन वाजता मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर पाच स्फोटकांचा आवाज झाला, अशी माहिती मोहम्मद आदिल नावाच्या व्यक्तीनं बीबीसीला दिली. काही वेळातच आवाज थांबले, असंदेखील तो म्हणाला.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सकाळी ट्विट केलं. भारतानं घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. 'भारतीय हवाई दलानं मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. याला पाकिस्तानी सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं त्वरित कारवाई केल्यानं भारतीय विमानांनी लगेच माघार घेतली,' असं गफूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं. पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष तहरिक ए इन्साफनंदेखील हल्ल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.
पाकिस्तानी लष्कर आणि सरकारनं भारतीय विमानं हद्दीत आलीच नाहीत, असा दावा केला. मात्र पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या ट्विट्समुळे हा दावा फोल ठरला. 'पहाटे 4 वाजता वाजता लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घालत आहेत. बालाकोटजवळ स्फोटकांचा आवाज येत आहे. पाकिस्तान झिंदाबाद,' अशी ट्विट्स काहींनी केली. पाकिस्तानच्या विमानांनी रात्री उड्डाणच केलं नव्हतं. याशिवाय पाकिस्ताननं कोणताही स्फोट घडवला नव्हता. त्यामुळे मध्यरात्री पाकिस्तानच्या आकाशात उडणारी विमानं भारताचीच होती, हे स्पष्ट झालं.