कोरोना लशीची चाहूल: देशातील विमानतळांवर तयारी सुरू; 'कोल्ड चेन'ची निर्मिती
By मोरेश्वर येरम | Published: November 20, 2020 09:54 AM2020-11-20T09:54:06+5:302020-11-20T09:59:04+5:30
लशीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी 'कोल्ड चेन स्टोरेज' व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो यूनिट्स तैनात करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली
कोरोनाला मात देणाऱ्या लशीच्या उपलब्धतेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी संपूर्ण भारतात लस पोहचविण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
भारतीय हवाईवाहतूक आणि विमानतळ व्यवस्थापनेने याबाबतचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लशीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहोचविण्यासाठी 'कोल्ड चेन स्टोरेज' व्यवस्था निर्माण केली जात आहे. विमानतळांवर कार्गो यूनिट्स तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर ग्रूपने दोन्ही ठिकाणी 'कुलिंग चेंबर्स' उभारले आहेत. याशिवाय इतर काही विमानतळांवर आणि हवाई वाहतूक कंपन्यांनी लशीच्या वाहतूकीची तयारी सुरु केली आहे.
जीएमआर ग्रूपकडे एक खास पद्धतीची 'टाइम एंड टेम्प्रेचर डिस्ट्रीब्यूशन' प्रणाली आहे. यात २५ डीग्री सेल्सिअसपासून ऋृण २० डीग्री सेस्लिअसपर्यंतचे तापमान निश्चित करता येते. दुसरीकडे स्पाइसजेटच्या कार्गो इकाई, स्पाइसएक्स्प्रेसने 'ग्लोबल कोल्ड चैन सोल्यूशन प्रोव्हाइडर्स'सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे स्पाइसजेटला एका निर्धारित तापमानात कोरोना लशीचे डोस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज आणि सुरक्षितरित्या वाहतूक करता येईल. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रासाठी हे आजवरचे सर्वोत मोठे एअर कार्गो मिशन ठरू शकते.
फायझरच्या लशीसाठी ऋृण ७० डीग्री सेल्सिअस तापमानाची गरज पूर्ण करणे हवाई वाहतूक प्रशासनासमोर खूप मोठे आव्हान ठरणार आहे. तरीही ऐनवेळी कोणतीही कमतरता भासू नये यासाठी आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.