9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय लष्कराला मिळणार अत्याधुनिक बुलेट प्रूफ जॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 08:52 AM2018-04-10T08:52:25+5:302018-04-10T08:52:25+5:30
भारतीय लष्कराची बुलेट प्रूफ जॅकेटची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
नवी दिल्ली - भारतीय लष्कराची बुलेट प्रूफ जॅकेटची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल 9 वर्षांनंतर संरक्षण मंत्रालयानं सोमवारी (9 एप्रिल) मेक इन इंडिया अंतर्गत 639 कोटी रुपयांचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला 1.86 लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत. एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेज या कंपनीला हा करार मिळाला आहे.
भारतीय लष्कराची बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केंद्र सरकारने 2009 मध्येही मान्य केली होती. मात्र त्यावेळी लष्कराने आयोजित केलेल्या ट्रायलमध्ये एकही कंपनी टिकू शकली नव्हती. सहभागी झालेल्या चारपैकी फक्त एका कंपनीने पहिला राऊंड पार केला होता.
दरम्यान करारासंदर्भात सांगताना मंत्रालयानं सांगितले की, 1,86,138 बुलेटप्रूफ जॅकेट्ससाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. नवीन बुलेटप्रूफ जॅकेट जवानांना ‘360 डिग्री सुरक्षा’ पुरवतील असा दावाही करण्यात आला आहे. या जॅकेटमध्ये सुरक्षेसंबंधी सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवल्या जातील, असं एसएमपीपी कंपनीने सांगितले आहे.