नवी दिल्ली: अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचं असं स्वप्न भारतातले अनेकजण पाहतात. मात्र आधी अमेरिकेची स्वप्नं पाहणाऱ्यांना आता त्या देशाच्या शेजारी असलेल्या कॅनडाची ओढ लागली आहे. त्यामुळे अमेरिकेसोबतच भारतातूनही कॅनडात जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. २०१८ मध्ये ३९,५०० भारतीय नागरिकांनी एक्स्प्रेस एंट्री स्कीमच्या अंतर्गत कॅनडाचं स्थायी नागरिकत्व मिळवलं. जगभराचा विचार केल्यास गेल्या वर्षी ९२ हजारांहून अधिक जणांनी कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४१ टक्क्यांनी जास्त आहे. २०१७ मध्ये जगभरातील ६५,५०० लोकांनी कॅनडाचं स्थायी नागरिकत्व मिळवलं. यातील २६,३०० जण भारतीय होते. २०१७ च्या तुलनेत कॅनडाचं नागरिकत्व मिळवणाऱ्या भारतीयांचं प्रमाण ५१ टक्क्यांनी जास्त आहे. तर २०१७ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीन २०१८ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. २०१८ मध्ये चीनच्या ५,८०० नागरिकांना कॅनडाचं नागरिकत्व मिळालं. २०१८ मध्ये नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर होता. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना व्हिसासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एच-१बी व्हिसा मिळण्यास होणारा उशीर, ग्रीन कार्ड बॅकलॉग, पती/पत्नीला एच-१बी व्हिसासाठी मिळणारा नकार यामुळे अमेरिकेत राहणारे अनेक भारतीय कॅनडामध्ये स्थलांतरित होत आहेत. भारतात राहणारे अनेकजणदेखील अमेरिकेऐवजी कॅनडाला पसंती देत आहेत. नोकरी किंवा कायमस्वरुपी वास्तव्यासाठी अनेकजण कॅनडाला जाण्यास उत्सुक आहेत.
अमेरिकेची ओढ ओसरली; भारतीयांची पसंती आता कॅनडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 10:07 AM