हैदराबाद - दुष्काळ आणि कर्जाला कंटाळून तेलंगणातील शेतकरीदुबईला गेला. तेथूनही निराश होऊन तो भारतात परतला मात्र येताना त्याने काढलेल्या एका लॉटरीच्या तिकिटामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. यूएई बिग तिकिट लॉटरीमध्ये या शेतकऱ्याला 29 कोटींची लॉटरी लागली. दर महिन्याला काढण्यात येणाऱ्या या लॉटरीमध्ये शेतकऱ्याने लॉटरीचं तिकीट काढलं होतं.
निजामाबाद गावात राहणारा शेतकरी विलास रिक्काला 2014 मध्ये दुबईला गेले होते. तेथे जाऊन त्यांनी कुली आणि ड्रायव्हरचं काम केलं. मागील महिन्यात त्यांचा व्हिसा संपल्यामुळे त्यांना भारतात परतावं लागलं. मात्र अबू धाबी सोडण्यापूर्वी विलास यांनी यूएईचं बिग तिकीट खरेदी करण्यासाठी 20 हजारांची मदत मागितली. विलासला अपेक्षा होती की त्यांचे नशीब उजळले तर त्यांचं आयुष्य बदलून जाईल या आशेने त्यांनी लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.
शनिवारी विलास यांच्या मित्राने दुबईवरुन कॉल केला आणि त्यांना ही आनंदाची बातमी दिली. मला ही लॉटरी लागेल असा विश्वास नव्हता. आम्ही सगळे आनंदात आहोत. मी माझ्या आईला ही बातमी सांगितली तरीही तिला विश्वास होत नाही अशी प्रतिक्रिया विलास रिक्कला यांनी दिली. तसेच बक्षिसामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. मिळालेल्या रक्कमेतून मुलींना चांगलं शिक्षण देणार आहे. विलास यांना 16 वर्षाची आणि 13 वर्षाची अशा दोन मुली आहेत.
अबू धाबी येथे इंटरनॅशनल एअरपोर्टवर दर महिन्याला ही लॉटरी काढली जाते. मूळ भारतीय लोकांमध्ये बिग तिकीट या लॉटरीचं भरपूर आकर्षण आहे. विलास यांनी या लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी 20 हजार रुपयांची रिस्क घेतली. मला ही लॉटरी लागण्याची अपेक्षा होती असं विलास यांनी सांगितले.