CoronaVirus News: भारतीय कामगारांची नोकरी गेली, बचतही संपली; मातृभूमीचं ऋण ओळखून ‘ती’ मदतीला धावली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 08:30 AM2020-06-28T08:30:49+5:302020-06-28T08:37:42+5:30
गेली 25 वर्षं शीला थॉमस यूएईमध्ये आहेत. पण, भारताशी त्यांची नाळ जोडलेली आहे. नोकरी गेल्यामुळे आणि लॉकडाऊन काळात बचत खर्च झाल्यामुळे अनेक कामगारांकडे पुरेसे पैसेही नाहीत. या कामगारांना शीला थॉमस यांचा मोठा आधार वाटतोय.
कोरोना काळात अनेक कंपन्या, उद्योग बंद झाल्यामुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो भारतीय कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. हातावर पोट असलेल्या या कामगारांकडे मायदेशी परतण्यावाचून काहीच पर्याय नाही. अशा परिस्थितीत, भारतीय महिला वकील त्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. त्यांचं नाव आहे, शीला थॉमस.
तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधील २,२०० कामगारांना पुन्हा भारतात जाता यावं, यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या मदत करत आहेत. विशेष म्हणजे, या कामासाठी त्या कुठलंही शुल्क आकारत नाहीत. उलट, रोज ३०० जणांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केली आहे. यूएईमधील एका मोठ्या वृत्तपत्रानं शीला थॉमस यांच्या कामाची बातमी दिली आहे. ‘‘अनेकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. अनेकांचे पासपोर्ट त्यांच्या कंपनीकडे आहेत. वेगवेगळी कारणं सांगून ते पासपोर्ट परत द्यायला टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे मीच आता या सर्व कामगारांना आवश्यक कागदपत्रं मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे’’, असे यांनी सांगितले.
शीला थॉमस या मूळच्या केरळच्या. हैदराबाद येथे त्यांचे बालपण गेले. गेली 25 वर्षं त्या यूएईमध्ये आहेत. पण, भारताशी त्यांची नाळ जोडलेली आहे. नोकरी गेल्यामुळे आणि लॉकडाऊन काळात बचत खर्च झाल्यामुळे अनेक कामगारांकडे पुरेसे पैसेही नाहीत. या कामगारांना शीला थॉमस यांचा मोठा आधार वाटतोय. त्यांचा मोबाईल नंबर यूएईमधील भारतीय कामगारांच्या वर्तुळात व्हायरल झाला आहे. त्यामुळे गरजू व्यक्ती त्यांना फोन करून मदत मागत आहेत आणि त्याही कुणालाच नकार देत नाहीत.
यूएई आणि किर्गिस्तानात अडकलेले 300हून अधिक लोक भारतात परतले!
कोरोनामुळे यूएई आणि किर्गिस्तानमध्ये अडकलेले एकूण 306 भारतीय नागरिक गुरुवारी भारतात परतले. दोन वेगवेगळ्या कंपन्यांची विमाने यांना घेऊन इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पोहोचली. यात यूएईमध्ये अडकलेल्या 158 जणांचा समावेश होता. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातीलही नागरिक होते.
यूएईमध्ये अडकलेले कर्नाटकातील 173 नागरिक 21 जूनला एका चार्टर्ड विमानाने मेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यासाठी केएससीसीने चार्टड विमानाची व्यवस्था केली होती.
यूएईच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तेथे 410 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. आतापर्यंत येथे 46,973 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 35,469 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. येथे कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.
Disclaimer: ‘फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.’