भारतीय नौदलात 56 महाशक्तिशाली जहाजे, शत्रूराष्ट्राला भरणार धडकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:29 PM2018-12-03T16:29:59+5:302018-12-03T16:31:47+5:30
नौदलाकडून 56 महाशक्तिशाली जहाज आणि पाणबुड्यांची खरेदी करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - भारतीय नौदल आपली ताकद वाढविण्यासाठी 56 नवीन महाशक्तिशाली जहाजे घेणार आहे. तसेच तिसरे विमानवाहक जहाजही आणण्याचा भारतीय नौदलाचा विचार आहे. त्यामुळे भारताच्या समुद्र तटावर नौदलाकडून दिवसरात्र पहारा देण्यात येईल, असे नौदल प्रमुख एडमिरल सुनिल लांबा यांनी सांगितले. आपल्या वार्षिक पत्रकार परिषदेत लांबा यांनी ही माहिती दिली.
नौदलाकडून 56 महाशक्तिशाली जहाजे आणि पाणबुड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या नौदलाची ताकद वाढणार असून शत्रू राष्ट्रांना धडकी भरेल. सध्या, समुद्र तटावरील सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने, मच्छीमारांच्या जवळपास 2.5 लाख जहाजांवर अॅटोमॅटीक आयडेंटीटी करणारे ट्रान्सपोंडर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच तिसऱ्या विमानवाहक जहाजालाही सामावून घेण्यात येईल, असे एडमिरल लांबा यांनी म्हटले.
मालदीवमध्ये भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छिणारे सरकार बनल्यास दोन्ही देशांची समुद्री सुरक्षा आणखीन शक्तिशाली होईल. तर अदनच्या खाड्यांमधील समुद्री डाकूंविरुद्ध मोहिमेला सध्या प्रतिबंध घालण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन याबाबत उपाय काढण्यात येत आहे. नौदलाने 2008 पासून 70 भारतीय महाशक्तिशाली जहाजांच्या मदतीने 3440 पेक्षा अधिक जहाज आणि त्यातील 25 हजार प्रवाशांना सुरक्षितपणे पोहोचवले आहे, हेही लांबा यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आम्ही असून त्यांना सर्वोतोपरी मदत करणार आहोत, असेही लांबा यांनी म्हटले.