समुद्रात दिसणार 'मेड इन इंडिया'ची ताकद! ६ पाणबुड्यांसाठी ५० हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 01:26 PM2021-06-04T13:26:53+5:302021-06-04T13:27:57+5:30
भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीनं केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'प्रोजेक्ट ७५- इंडिया' अंतर्गत ६ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.
भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीनं केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'प्रोजेक्ट ७५- इंडिया' अंतर्गत ६ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून हा प्रकल्प रखडला होता. पण आता त्यास गती मिळणार आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नौदलासाठी ६ पाणबुड्या निर्मिती कऱण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पाणबुड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असणार असून त्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकवर केली जाणार आहे. पाणबुडीच्या निर्मितीचं काम माझगाव डॉक लिमिटेड आणि एल अँड टी कंपनीला देण्यात आलं आहे.
नेमका प्रकल्प काय?
समुद्रातील ताकद वाढविण्यासाठी भारतीय नौदलानं 75-I हा प्रकल्प हाती घेतला आहे. यात ६ दमदार पाणबुड्यांची निर्मिती केली जाणार आहे. या पाणबुड्या डिझेल आणि इलेक्ट्रीक असणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे यांचा आकार सध्याच्या स्कॉर्पिअन क्लास पाणबुडीपेक्षाही पाच पटींनी मोठा असणार आहे.
भारतीय नौदलानं या नव्या पाणबुड्यांच्या निर्मिताबाबत ठेवलेल्या मागणीनुसार यात हेवीड्युटी फायरपावर सुविधा असणं अपेक्षित आहे. भारताकडे सध्या एकूण १४० युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. तर पाकिस्तानकडे फक्त २० युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. मात्र चीनचा वाढता धोका लक्षात घेता भारताला समुद्र क्षेत्रात अधिक ताकदवान होण्याची गरज असल्यानं येत्या काळात नौदलाची ताकद वाढविण्याची योजना भारतानं केली आहे.