दरमहा 8 लाख ऑनलाईन तिकिटं होतात रद्द; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:59 PM2020-01-20T13:59:54+5:302020-01-20T14:12:32+5:30
रेल्वेने असंख्य प्रवासी दररोज प्रवास करत असतात.
नवी दिल्ली - रेल्वेने असंख्य प्रवासी दररोज प्रवास करत असतात. लांबचा प्रवास करायचा असल्यास काही महिने अथवा दिवसआधीच रिझर्व्हेशन केलं जातं. काही कारणांमुळे अनेकदा ऑनलाईन तिकीट रद्द करावं लागतं तर काही वेळा ते आपोआप होतं. तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे गेल्या आठ महिन्यात तब्बल 65.69 लाख ऑनलाईन तिकिटं आपोआप रद्द झाली आहे. याचाच अर्थ दर महिन्याला सरासरी 8 लाखांहून अधिक ऑनलाईन तिकिटं कन्फर्म होत नसल्याने रद्द होत असल्याची माहिती समोर आली आहे. तिकीट रद्द झाल्याने प्रवाशांना काही समस्यांचा सामना करावा लागतो.
मध्य प्रदेशमधील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ला माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे. गौर यांना आठ जानेवारीला पाठविण्यात आलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली 65,68,852 तिकिटं चार्ट तयार होताना कन्फर्म न झाल्यामुळे आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर आपोआप रद्द झाली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'ऑनलाईन काढण्यात येणारी तिकिटं चार्ट तयार होताना कन्फर्म झाली नसल्यास स्वत:हून रद्द होतात. त्यानंतर रेल्वेतर्फे तिकीट रद्द होण्याचे शुल्क कापून उर्वरित रक्कम आयआरसीटीसीला दिली जाते. त्यानंतर आयआरसीटीसीकडून तिकिटांची रक्कम ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात येते' अशी माहिती आरटीआयच्या माध्यमातून देण्यात आलेल्या उत्तरात दिली आहे. कन्फर्म न झाल्यामुळे वेटिंग लिस्टमध्येच अडकून पडलेल्या प्रवाशांची तिकिटं रद्द करण्यासाठी रेल्वेकडून वसूल करण्यात आलेल्या शुल्काविषयी गौर यांनी माहिती मागितली असता, ती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
...म्हणून उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणार रेल्वे स्थानकांची नावं
Budget 2020: प्रत्येक बजेटआधी हलवा करण्यामागचं 'शास्त्र' तुम्हाला माहीत आहे का?
साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं?
शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी?
3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी