कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेच्या सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या. या काळात रेल्वेला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेला तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. याकाळात मालगाड्यांनी मात्र चांगलं उत्पन्न मिळवून दिलं असल्याचंही ते म्हणाले.
मुंबई-नागपूर महामार्गाप्रमाणेच याच मार्गावर बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्याचा विचार सुरू असल्याचेही संकेत दानवेंनी यावेळी दिले. जालना येथील रेल्वे स्थानकावर एका अंडरब्रिज प्रकल्पाच्या कार्यक्रमात दानवे उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात रेल्वेला ३६ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. तर मालगाड्यांनी रेल्वेला चांगलं उत्पन्न मिळवून दिलं. रेल्वेला झालेला तोटा कमी करण्यास मालगाड्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असं दानवे म्हणाले. यावेळी त्यांनी नांदेड आणि मनमाड स्थानकांदरम्यान रेल्वेच्या रुळाच्या दुपदरीकरणाचं आश्वासन देखील यावेळी दिलं. तेजस एक्स्प्रेस सारखंच आणखी काही खासगी रेल्वेगाड्या चालविण्याचा विचार असल्याचं दानवे म्हणाले. रेल्वे क्षेत्रात खासगीकरण वाढविण्याच्या उद्देशानं लवकरच मोठे निर्णय घेतले जाणार असून यासाठी खासगी कंपन्यांकडून टेंडर मागविण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.