डब्ल्यूएचओने (WHO) नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, भारत आजारांचा सामना करण्यात पूर्वीच्या तुलनेत आता अधिक चांगली कामगिरी करत आहे. याच बरोबर, भारतात आजारांचे प्रकार बदलले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. इंडिया हेल्थ सिस्टिम रिव्ह्यू (India Health System Review) नावाच्या या अहवालात भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा लेखाजोखा देण्यात आला आहे.
अहवालात अनेक खुलासे - या अहवालात म्हणण्यात आले आहे, की भारतीयांचे सरासरी वय तर वाढले आहे, पण उपचारांचा खर्च लोकांच्या बजेट बाहेर जात आहे. एकूणच, भारताने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. मात्र, अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे.
भारतीयांच्या सरासरी वयात मोठी सुधारणा -भारतात 1970 मध्ये लोक 47 वर्षांपर्यंत जगत होते, आता (2020च्या आकडेवारीनुसार) भारतीयांचे सरासरी वय 70 वर्षं झाले आहे. महिलांचे सरासरी वय 24 वर्षांनी वाढले आहे तर पुरुषांचे वय 20 वर्षांनी वाढले आहे. यानुसार भारतातील महिलांचे सरासरी वय 71 वर्षे आणि पुरुषांचे सरासरी वय 68 वर्षे आहे. श्रीलंकेतील सरासरी वय 74 वर्षे असून चीनमध्ये सरासरी वय 75 वर्षे आहे.
नवजात बालकांच्या मृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा -या अहवालानुसार, 1970 मध्ये 1000 बालकांपैकी 132 बालकांचा जन्माला येताच मृत्यू होत होता. मात्र, आता या आकड्यातही मोठी सुधारणा झाली आहे. 2020 च्या आकडेवारीनुसार, 1000 पैकी 32 नवजात बालकांचा मृत्यू होतो. तसेच, प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही घट झाली आहे. 1990 च्या आकडेवारीनुसार 10 हजारांपैकी 556 महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, 2018 पर्यंत हा आकडा कमी होऊन 10 हजारपैकी 113 वर आला आहे.
पब्लिक हेल्थवर कमी खर्च करतो भारत - याचप्रमाणे, भारतात 10 हजार लोकांमागे 9.28 टक्के डॉक्टर आणि 24 परिचारिका आहेत. याच बरोबर 10 हजार लोकांमागे 9 फार्मासिस्ट असल्याचेही अहवालात म्हटले आहे. भारतात सार्वजनिक आरोग्यावर फार कमी खर्च करतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.