भारतातील नैसर्गिक वायूचे साठे 45 वर्षे पुरतील, माहितीच्या अधिकारातून मिळाले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 02:42 PM2017-10-26T14:42:25+5:302017-10-26T14:53:21+5:30
नोएडा- भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांवरुन हे साठे भारताला पुढील 45 वर्षे पुरतील असे उत्तर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी भारतात 2005 पासून देशात नैसर्गिक वायूचे किती उत्पादन झाले, त्यामध्ये कोणत्या राज्याचा किती वाटा आहे आणि हे साठे किती वर्षे पुरतील अशी माहिती विचारली होती. 2016-17 वर्षाच्या उत्पादनाची गती आणि 31 मार्च 2017 रोजी उपलब्ध असणाऱ्या साठ्यांचा विचार करता भारताला हे साठे पुढील 45 वर्षे पुरतील असे सारडा यांना मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे.
या उत्तरात 2004-05 या वर्षापासून नैसर्गिक वायू उत्पादनाची आरडेवारीही देण्यात आली आहे. 2004-05 या वर्षी भारतात 31.76 अब्ज क्युबिक मिटर्स नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. 2015-16 या वर्षी हे उत्पादन 32.25 अब्ज क्युबिक मिटर्स तर 2016-17 या वर्षी 31.90 अब्ज क्युबिक मिटर्स इतके उत्पादन झाले. या वर्षी म्हणजे 2017 साली ऑगस्ट महिन्यापर्यंत 13.69 अब्ज क्युबिक मिटर्स इतके नैसर्गिक वायूचे उत्पादन झालेले आहे.
नैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये वेस्टर्न ऑफशोअरचा सर्वात मोठा वाटा असून येथे एकूण उत्पादनापैकी 59 टक्के वायूचे उत्पादन होते. तर इस्टर्न ऑफशोअरवर 9 टक्के उत्पादन होते. आसाम राज्यामध्ये 14 टक्के, गुजरातमध्ये 5 टक्के, तामिळनाडूमध्ये आणि राजस्थानात प्रत्येकी 4 टक्के उत्पादन होते. इतर राज्यांमध्ये यापेक्षा कमी उत्पादन होते.
नैसर्गिक वायूची दिवसेंदिवस वाढणारी गरज पाहता आणि तेलापेक्षा पर्यावरण पूरक म्हणून नैसर्गिक वायूला वाहनांमध्ये पसंती मिळत असताना नैसर्गिक वायूच्या उत्पादनाची गरज असल्याचे मत सारडा यांनी व्यक्त केले आहे. येणारी 100 वर्षांची गरज पूर्ण होईल इतक्या साठ्यांचा शोध व उत्पादन व्हावे अशी विनंती प्रफु्ल्ल सारडा यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.