भारताचा पायलट पाकिस्तानमध्येच, त्याची सुखरूप सुटका करा, भारताची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:23 PM2019-02-27T19:23:32+5:302019-02-27T19:42:38+5:30
आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे मायदेशी पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे.
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमुळे खवळलेल्या पाकिस्तानने आज भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला होता. या चकमकीवेळी भारताचे एक विमान कोसळून एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. दरम्यान, आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे भारतात पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे.
पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ला करण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांसमोर पाकिस्तानने आज भारतीय हवाई हद्दीच्या केलेल्या उल्लंधनाबाबत निषेध नोंदवण्यात आला. तसेच भारताने बालाकोट येथे केलेला एअर सर्जिकल स्ट्राइक ही असैन्यिकी आणि दहशतवाद विरोधी हल्ला होता, असेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटच्या सुरक्षिततेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. तसेच जखमी वैमानिकाला मारहाण करून पाकिस्तानने जिनेव्हा करारामधील मानवाधिकारासंबंधीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोपही भारताने केला. त्याबरोबरच जिनेव्हा कराराला अनुसरून पाकिस्तानने या पायलटची सुटका करावी, अशी मागणी केली आहे.