प्रवाशाला मारहाण करणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्याची झाली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 08:33 AM2017-11-08T08:33:47+5:302017-11-08T08:35:39+5:30
इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं आहे.
नवी दिल्ली- इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राजीव कात्याल असं मारहाण झालेल्या प्रवाशाचं नाव आहे.
इंडिगोचा ग्राऊंड स्टाफ आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. याचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता. 15 ऑक्टोबर रोजी घडलेली ही घटना आहे. इंडिगोने घटनेची दखल घेत तातडीने या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलं असून राजीव कात्याल यांची माफी मागितली आहे. नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनीही इंडिगोकडून या घटनेबाबत स्पष्टीकरण मागत घटनेचा निषेध केला आहे.
राजीव कात्याल यांनी चेन्नईतून दिल्लीला येण्यासाठी 6E 487 या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कात्याल यांनी शिवी दिल्याचा आरोप इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केला.
व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे कात्याल आणि कर्मचारी यांच्यात वाद सुरु असताना या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसमध्ये जाऊ दिले नाही. त्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना धक्काबुक्की केली. दोनपैकी एका इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी कात्याल यांचा गळा धरला. कात्याल त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. काही तरी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचं पोलीस अधिकारी संजय भाटिया यांनी म्हटलं.
#WATCH: IndiGo staff manhandle a passenger at Delhi's Indira Gandhi International Airport (Note: Strong language) pic.twitter.com/v2ola0YzqC
— ANI (@ANI) November 7, 2017