आजारी सुटी टाकून इंडिगोचे चालक एअर इंडियाच्या भरतीसाठी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:30 AM2022-07-04T09:30:29+5:302022-07-04T09:30:49+5:30
अनेक उड्डाणे खोळंबली : डीजीसीए करणार चौकशी, टाटा समूहाने यावर्षी २७ जानेवारी रोजी एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. आता एअर इंडियाने चालक दलाच्या नव्या सदस्यांसाठी भरती मोहीम सुरू केली आहे.
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या भरतीसाठी इंडिगोचे चालक दलाचे सदस्य आजारपणाची सुटी टाकून गेल्याने इंडिगोच्या देशांतर्गत विमान उड्डाणावर त्याचा थेट परिणाम झाला. इंडिगोच्या ५५ टक्के उड्डाणांना शनिवारी उशीर झाला. या प्रकरणाची डीजीसीए चौकशी करणार आहे.
याबाबत विचारणा केली असता नागरी विमान महासंचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार यांनी रविवारी सांगितले की, याबाबत माहिती आम्ही घेत आहोत. सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाच्या भरती अभियानाचा दुसरा टप्पा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. आजारी सुटी टाकून इंडिगोचे चालक दलाचे बहुतांश सदस्य एअर इंडियाच्या भरतीसाठी गेले होते. त्यामुळे अनेक उड्डाणांना सुमारे तासभर विलंब झाला. इंडिगो सध्या रोज जवळपास १,६०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे संचालन करते. इंडिगोला याबाबत विचारणा केली असता कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
टाटा समूहाने यावर्षी २७ जानेवारी रोजी एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. आता एअर इंडियाने चालक दलाच्या नव्या सदस्यांसाठी भरती मोहीम सुरू केली आहे. नवीन विमान खरेदी करणे आणि आपल्या सेवेत सुधारणा करण्याची योजना
एअर इंडियाकडून आखण्यात येत आहे.
४५ टक्के विमानांना विलंब
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, इंडिगोच्या ४५.२ टक्के विमानांनी शनिवारी वेळेवर उड्डाण केले. त्या तुलनेत शनिवारी एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा, गो फर्स्ट आणि एअर एशिया इंडियाची क्रमश: ७७.१ टक्के, ८०.४ टक्के, ८६.३ टक्के, ८८ टक्के आणि ९२.३ टक्के उड्डाणे वेळेवर झाली.
इंडिगोत काय सुरू आहेत घडामोडी
इंडिगोचे सीईओ रॉनजॉय दत्ता यांनी ८ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे सांगितले होते की, पगार वाढविणे ही एक कठीण समस्या आहे; पण एअरलाइन्स नफा आणि स्पर्धात्मक वातावरण या आधारे वेतनाचे सतत पुनरावलोकन करेल. इंडिगोने ४ एप्रिल रोजी काही वैमानिकांना निलंबित केले होते. कारण, कोरोना काळात लागू केलेल्या वेतन कपातीच्या निषेधार्थ ते मंगळवारी संप करण्याची योजना आखत होते.