अहमदाबाद- काँग्रेसला गरीबविरोधी पक्ष ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर उच्चभ्रूंचा पक्ष असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचे उदहारण दिले. इंदिरा गांधी एकदा मोरबीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी चित्रलेखा मासिकात प्रसिद्ध झालेला त्यांचा फोटो आजही मला आठवतो. मोरबीच्या रस्त्यावर घाण वास येत असल्यामुळे इंदिरा गांधींनी नाकावर रुमाल धरला होता. पण जनसंघ आणि आरएसएससाठी मोरबीचे रस्ते सुगंधी होते. मानवतेचा तो सुंगध होता असे पंतप्रधान मोरबी येथील सभेत म्हणाले.
चांगल्या आणि वाईट काळात आम्ही मोरबीच्या जनतेसोबत होतो. पण काँग्रेसबद्दल हेच बोलता येणार नाही. आम्ही सत्तेत आलो तेव्हा कच्छ आणि सौराष्ट्रामध्ये पाणी टंचाई मुख्य समस्या होती. काँग्रेससाठी हँडपंप देणे हा विकास होता पण भाजपाने सिंचन योजना आणि मोठया पाईप लाईन टाकून नर्मदेचे पाणी आणले असे मोदींनी सांगितले.
182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत मोरबीमध्ये तीन जागा आहेत. भाजपाकडे दोन, काँग्रेसकडे एक जागा आहे. मोरबीची एकूण उलाढाल 25 हजार कोटींची आहे. एकूण दहा लाख लोक मोरबीमध्ये नोकरी करतात. मोरबी सौराष्ट्राच्या मध्यभागी असून सिरॅमिक टाइल निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली पटेल आरक्षण आंदोलनाचे मोरबी मुख्य केंद्र होते.
मोदी लाट ओसरली!गुजरातमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची जादू चालली होती. एकप्रकारे त्यांची लाटच आली होती. मोंदीच्या लाटेमुळे भाजपानं केंद्रात एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यासारख्या राज्यामध्ये भाजपा सत्तेत आली. पण सध्या गुजरातमध्ये नरेंद्र मोदीं यांची लाट ओसरल्याचे दिसत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जसदणमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती. मिळालेल्या वृत्ताननुसार, त्यांच्या या सभेसाठी 1200 खुर्च्यांची सोय करण्यात आली होती. मात्र त्यातील फक्त 400 खुर्च्यांवर लोक बसले होते आणि 800 खुर्च्या खाली होत्या.