सिंधू सुदर्शन युद्ध सरावात ‘हेलीबोर्न’ने घेतला अचूक वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 02:47 AM2019-11-17T02:47:33+5:302019-11-17T02:47:45+5:30
ताशी ६0 कि.मी. वेग : के ९ वज्र तोफेने वाढविली तोफखान्याची मारक क्षमता
- निनाद देशमुख
पोखरण (राजस्थान) : भारतीय तोफखान्यात नव्याने दाखल झालेल्या कोरियन बनावटीच्या ‘के ९ वज्र’ तोफांनी सिंधू सुदर्शन युद्ध सरावात लक्ष्याचा अचूक वेध घेऊन मारक क्षमता सिद्ध केली. गेल्या वर्षी नाशिक येथे एका कार्यक्रमात या तोफा माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या हस्ते लष्कराला सुपुर्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रथमच या तोफा युद्ध सरावात वापरण्यात आल्या.
सिंधू सुदर्शन युद्ध सरावात शनिवारी काल्पनिक युद्धात या तोफांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यावर शत्रूकडून होणाऱ्या तोफांचा मारा चुकवत वेगाने हालचाली करून दुसºया सुरक्षित ठिकाणी जात शत्रूवर नेम धरत या तोफांनी त्याची ठिकाणे उद्ध्वस्त केली. यादरम्यान शत्रूला चकवण्यासाठी दुसºया ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे युद्धभूमीत सैनिकांना उतरविण्यात आले. तर दुसºया आघाडीवर रणगाडे, चिलखती वाहनातून जवानांना घेऊन शत्रूवर चाल करण्यात आली. घमासान युद्धात आधुनिक डॉपेचाद्वारे त्यांचा पराभव करत त्यांच्या भूमीवर भारतीय ध्वज फडकविण्यात आला. युद्ध सरावात शत्रू सीमेत गेल्यावर विविध बॅटल ग्रुपमध्ये योग्य ताळमेळ साधण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करण्यात आला. शत्रूची चारही बाजूने कोंडी करत भारतीय सैनिकांनी आपल्या क्षमता या सरावात सिद्ध केल्या.
जवान पुढे जात असताना शत्रूची जास्तीतजास्त हानी करण्यासाठी रॉकेट आणि मिसाईलनंतर तोफखान्याचा वापर होतो. यापूर्वी लष्कराच्या तोफखान्याकडे मोठ्या अंतरावर मारा करू शकणाºया बोफोर्स तोफा होत्या. मात्र, वेगाने हालचाली करण्यास मर्यादा होत्या. ही उणीव भरून काढण्यासाठी के ९ वज्र तोफा दक्षिण कोरियाकडून खरेदी केल्या आहेत. यातील १८ तोफा हस्तांतरित केल्या आहेत, तर उर्वरित तोफा भारतातच दोन्ही देशांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे बनविण्यात येत आहेत.
‘के ९ वज्र’ची वैशिष्ट्ये
दक्षिण कोरियाकडून खरेदी केलेल्या के ९ वज्र तोफेने भारतीय तोफखान्याची मोठी उणीव भरून काढली आहे. वज्र तोफा या रणगाड्यासारख्या वाहनावर बसविण्यात आल्या आहेत. यामुळे वेगाने एका ठिकाणावरून दुसºया ठिकाणी हालचाली करता येतात. ताशी ६० किमी वेगाने युद्धभूमीत ही तोफ एका ठिकाणावरून दुसºया ठिकाणी नेली जाऊ शकते. तर १५५ एमएम बॅरल तोफेतून ३ मिनिटांत १५ गोळे डागण्याची आणि जवळपास ४० किमीपर्यंत लक्ष्य भेदण्याची या तोफेची क्षमता आहे.