Inflation: इंडोनेशियात एक लीटर पाम तेलाची किंमत २२ हजार रुपयांवर, भारतावरही होणार मोठा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 02:00 PM2022-04-08T14:00:07+5:302022-04-08T14:00:56+5:30
Inflation: इंडोनेशिया हा कच्च्या पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र हाच देश आता पाम तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. येथील पाम तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
जाकार्ता - इंडोनेशिया हा कच्च्या पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र हाच देश आता पाम तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. येथील पाम तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मार्चमध्ये एक लीटल ब्रँडेड रिफाईंड पाम तेलाची किंमत ही २२ हजार इंडोनेशियन रुपये एवढी झाली आहे. गतवर्षी हीच किंमत १४ हजार रुपयांपर्यंत होती.
इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या पाम तेलाच्या किमतीचा परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहे. तसेच भारतावरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया जगातील सर्व देशांना सीपीओची निर्यात करतो. त्यामुळे आता इतर वनस्पती तेलाच्या किमतीवरही होत आहे. कारण वनस्पती तेल प्रत्येक घरातील भोजनातील महत्त्वाचा भाग आहे.
२०२० मध्ये इंडोनेशियात ४.४८ कोटी टन एवढ्या सीपीओचं उत्पादन झालं. यातील ६० टक्के खासगी कंपन्यांनी केलं. तर ३४ टक्के शेतकरी आणि ६ टक्के सरकारी कंपन्यांनी उत्पादन केलं. देशातील सीपीओचं संपूर्ण उत्पादन खासगी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांकडे आहे. या खासगी व्यावसायिकांनीच जागतिक परिस्थिती पाहून देशात पामतेलाचं संकट निर्माण केलं. देशातील व्यापारमंत्री मोहम्मद लुफ्ती यांनी या परिस्थितीसाठी तेलमाफियांना जबाबदार धरले होते.
रशिया-युक्रेनमधील युद्ध आणि अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्षानेही या पाम तेलाच्या संकटाला हातभार लावला. रशिया आणि युक्रेनमधून ७५ टक्के सूर्यफुलाच्या तेलाचा पुरवठा होतो. मात्र तणावामुळे त्यावर परिणाम झाला. तसेच भारत आणि ब्राझीलसारख्या देशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने सीपीओच्या मागणीत प्रचंड वाढ झाली.
दरम्यान, इंडोनेशियन सरकारने पाम तेलाच्या किमतींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रँडेड रिफाईंड पाम तेलाची किंमत १४ हजार रुपये निश्चित केले. लोकांना एकावेळी २ लिटर तेल खरेदी करता येईल, असा नियम केला. तसेच निर्यातदारांना ३० टक्के उत्पन्न देशांतर्गत बाजारात विकणे अनिवार्य केले. मात्र खासगी व्यावसायिकांनी याला विरोध केला. आता ते घरगुती बाजारात आणि निर्यातीसाठीही पुरवठा करत नाही आहेत.
इंडोनेशियामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार भारत आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारताने जानेवारीमध्ये १२.७० लाख टन खाद्य तेलाची आयात केली होती. गेल्या वर्षी जानेवारीच्या १०.९६ लाख टनच्या तुलनेत १६ टक्के अधिक राहिली. लक्षणीय बाब म्हणजे भारतातील खाद्य तेलाच्या आयातीमधील ६० टक्के हिस्सा हा पाम तेलाचा असतो.
दरम्यान, इंडोनेशियात पाम तेलाचे संकट निर्माण झाल्यानंतर भारतामध्येही खाद्य तेलाच्या किमतींमध्ये २५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्यासाठी सरकारने काही पर्यायी उपाय केले आहेत. पाम तेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. तसेच सूर्यफुलाच्या तेलाची आयात वाढवण्यात आली आहे. भारताने हल्लीच रशियाकडून ४५ हजार टन सूर्यफुलाच्या तेलाची आयात केली आहे.