देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 09:08 AM2024-11-29T09:08:25+5:302024-11-29T09:09:45+5:30
गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.
नवी दिल्ली - केंद्र सरकार जनतेच्या हिताचे काम करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीत आणि आकडेमोड करण्यात गुंतले असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला. सरकारचे संपूर्ण लक्ष महागाई कमी करण्यावर नसून आकडे कमी दाखविण्यावर असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.
ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांकाची आकडेवारी अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे की, महागाई नियंत्रणात येईल, तर सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा सातत्याने वाढत असल्याचे वास्तव आहे.
गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. खाद्यपदार्थ, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः डाळी, तेल, भाजीपाला आणि दूध यासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्याचा सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल आणि डिझेल महागले. त्यामुळे वाहतूक आणि इतर सेवांचा खर्च वाढला. आज महागाई वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आहेत. अशामध्ये सरकार महागाई कमी करण्यापेक्षा आकडे कमी करण्यालाच प्राधान्य असल्याचा दावा रमेश यांनी केला.
आकडेमोड करून देशाची दिशाभूल
महागाई कमी दाखविण्याचा हा सरकारचा पहिलाच प्रयत्न नाही. केंद्र सरकारने वारंवार आकडेमोड करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा भाजप सरकार जीडीपी विकास दरात यूपीए सरकारपेक्षा मागे पडू लागले तेव्हा आधार वर्ष बदलून विकास दर कृत्रिमरीत्या वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. असे करून देशाची खरी आर्थिक स्थिती लपवली गेली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.