बंगळुरू : झटपट कर्ज मिळवून देणाऱ्या अॅपनी केलेल्या माहिती चोरीची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे थेट चीनपर्यंत जाऊन पोहोचत असल्याचे म्हटले आहे.
झटपट कर्ज देत असल्याचे सांगणाऱ्या ॲप्सचा सर्व्हर चीनमध्ये आहे. या प्रकरणाशी संबंधित चार कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे संचालकही चीनमधीलच आहेत. बंगळुरूच्या सायबर क्राइम-सीआयडी विभागाचे पोलीस अधीक्षक एम. डी. शरद यांनी सांगितले की, ज्या चार कंपन्यांवर सीआयडीने धाडी टाकल्या त्या कंपन्यांचे सर्व नियंत्रण चीनमधून केले जाते. जे मोबाइल हॅक करण्यात आले, त्यातील माहिती चोरण्याच्या प्रकाराशीही चीनमधील व्यक्तींचा हात आहे.
मॅड एलिफंट टेक्नॉलॉजीज, बोरायांक्सी टेक्नॉलॉजीज, प्रॉफिटाइज्ड टेक्नॉलॉजीज, विझप्रो सोल्यूशन्स या बंगळुरूमधील चार कंपन्यांवर सीआयडीने या आठवड्यात धाड टाकून दोन लोकांना अटक केली होती. झटपट कर्ज मिळवून देणाऱ्या कंपन्यांनी आपली माहिती चोरली असल्याची तक्रार काही लोकांनी पोलिसांकडे केली होती. ही माहिती चोरून ग्राहकांना धमकाविण्यात येत असे. काही महिला ग्राहकांना अश्लील भाषेत सुनावण्यात आले होेते. तुमच्यावर बलात्कार करण्यात येईल, असे म्हणण्यापर्यंत धमकी देणाऱ्यांची मजल गेली होती. (वृत्तसंस्था)
विचित्र संदेशहीग्राहकांच्या हॅक केलेल्या मोबाइलमधील फोन नंबरचा वापर करून नवे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले व त्यावर विचित्र संदेशही हॅकरनी पाठविले. या सर्व प्रकारांमुळे हैराण झालेल्या लोकांनी बंगळुरू पोलिसांकडे धाव घेतली होती.