हाजीपूर: केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पशुपती कुमार पारस यांनी आज हाजीपूरचा दौरा केला. या दौऱ्यावर त्यांना हाजीपूरमध्ये प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर ते प्रथमच हाजीपूरला आले होते. पशुपती कुमार पारस हाजीपूरला पोहोचल्यानंतर, जनतेला अभिवादन करताना त्यांच्या ताफ्यावर चौरसिया चौकाजवळ काळी शाई/रंग फेकण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंर पशुपती कुमार पारस पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ असलेल्या हाजीपूरमध्ये आले होते. तिथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. तेव्हा अचानक चौरसिया चौकाजवळ त्यांच्या ताफ्यावर काळी शाई/रंग फेकण्यात आला. तसेच, त्यांना काळे झेंडेदेखील दाखवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान, पशुपती पारस यांच्या अंगावर काळा रंग उडाला नसला तरी, त्यांच्या गाडीवर रंग उडाला आहे. पशुपती पारस बसून आलेल्या गाडीवर काळा रंग उडालेला दिसत आहे. त्यांच्या गाडीसह ताफ्यातील इतर गाड्यांवरही काळा रंग उडाल्याची माहिती आहे.
का झाला विरोध ?काही दिवसांपूर्वी हाजीपूरमध्ये आलेल्या पूरादरम्यान पशुपती पारस यांनी आपल्या मतदारसंघाची पाहणी केली नव्हती. त्यामुळे नागरिक नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. पण, काही वेळानंतर नागरिकांना शांत करण्यात आलं.