मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी आयएनएस कलवरी या स्कॉर्पियन पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले. आयएनएस कलवरीच्या नौदलातील समावेशाने आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करत असून दहशतवादाविरोधात कलावरी महत्वाची भूमिका बजावेल असे मोदींनी सांगितले. आयएनएस कलवरी स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. मोदींनी या पाणबुडीला सागर हे विशेष नाव दिले.
सागर नाव देण्यामागे . 'security and growth for all in the region' सुरक्षा आणि सर्व प्रदेशाचा विकास असा अर्थ असल्याचे मोदींनी सांगितले. भारताची सुरक्षा आणि स्थिरतेमध्ये कलवरी महत्वाची भूमिका पार पडले असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सुरक्षित भारत फक्त आपल्यासाठी नव्हे संपूर्ण मानवतेसाठी आवश्यक असल्याचे मोदींनी सांगितले. आयएनएस कलवरीमुळे चीनची सागरातील दादागिरी मोडून काढता येणार आहे.
स्कॉर्पियन प्रकारच्या सहा पाणबुडयांमधील आयएनएस कलवरी पहिली पाणबुडी आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत या पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. स्टेल्थ तंत्रज्ञान हे कलावरीचे वैशिष्टय आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञाने युक्त असलेली कलावरी शत्रूवर अचूक वार करु शकते. आजच्या या माझगाव गोदीतील कार्यक्रमाला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणही उपस्थित होत्या.
फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ या कंपनीच्या सहकार्याने सहा पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प माझगाव गोदीत सुरू आहे. फ्रान्सबरोबर तीन अब्ज डॉलरच्या कराराद्वारे डिझेल-इलेक्ट्रिकवरील पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याचा निर्णय झाला होता. या करारानुसार २०१३ साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी तब्बल चार वर्षांच्या विलंबानंतर पहिली पाणबुडी नौदलात दाखल झाली. त्यापैकी कलवरी आणि खंदेरी या दोन पाणबुड्या नौदलाकडे या वर्षी सुपुर्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आता तब्बल १२० दिवसांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर, कलवरी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे, तर खंदेरीच्या सागरी चाचण्या सुरू आहेत. कलवरी पाणबुड्याच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. २०२१ पर्यंत स्कॉर्पियन श्रेणीतील उर्वरित पाणबुड्या नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.