नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. एका तरुणाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. रिक्षाचालकाच्या लेकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. IAF फ्लाईंग ऑफिसर होऊन नेत्रदीपक भरारी घेतली आहे. जी. गोपीनाथ (G. Gopinath) असं या तरुणाचं नाव असून त्याने फ्लाईंग ऑफिसर होण्याचं आपलं स्वप्न साकार केलं आहे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याने अनेक अडचणींचा सामना केला. पण हार मानली नाही आणि रिक्षाचालकाचा मुलगा इंडियन एयरफोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर झाला आहे. मुलाची कौतुकास्पद कामगिरी पाहून आईवडिलांना खूप आनंद झाला आहे.
द न्यूइंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ यांच्या घरची परिस्थिती ही अतिशय हालाखीची होती. त्यांचे वडील हे गेल्या 25 वर्षांपासून रिक्षा चालवायचे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्यावर होती. रिक्षा चालवून घरचा सर्व खर्च आणि मुलांचं शिक्षण करणं खूप कठीण होतं. पण वडिलांनी कधीच हिंमत नाही हरली. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. गोपीनाथ यांच्या वडिलांना ते इंजिनिअर व्हावे असं वाटत होतं. पण त्यांच्या आजोबांना त्यांनी सैन्यात जावं असं वाटत होत. कारण ते भारतीय सैन्यात कार्यरत होते.
(फोटो - द न्यूइंडियन एक्स्प्रेस)
"माझ्या शिक्षणासाठी आईवडिलांनी अनेक अडचणींचा सामना केला त्यामुळे मी शिकलो" असं गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. ते सर्वप्रथम एअरफोर्समध्ये एअरमॅन म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांचं स्वप्न हे फ्लाईंग ऑफिसर होणं हे होतं. ते त्यासाठी खूप अभ्यास करत होते. काम करत असताना त्यांनी या पदासाठी खूप मेहनत देखील घेतली. आवश्यक असणारी तयारी केली आणि आपलं फ्लाईंग ऑफिसर होण्याचं स्वप्न देखील पूर्ण केलं आहे. गोपीनाथ यांची बहीण गौरी हिच्या आपल्या भावावर पूर्ण विश्वास होता.
भावाला फ्लाईंग ऑफिसर झालेलं पाहून आनंद झाल्याचं म्हटलं आहे. तसेच आज आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज झाल्याची भावना देखील गौरी यांनी व्य़क्त केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना भावाने अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि घवघवीत यश संपादन केल्याचं सांगितलं आहे. गोपीनाथ यांचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. तसेच त्यांच्यामुळे अनेक तरुणांना देखील प्रेरणा मिळाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.