- नितीन अग्रवालनवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांचा काँग्रेस पक्षाने अपमान केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजपने म्हटले की, काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत गांधी कुटुंबाची प्रशंसा करण्यासाठी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांना खलनायकाप्रमाणे सादर केले गेले. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, शनिवारी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत काश्मीरशी संबंध असलेले कार्यकारिणी समितीचे स्थायी सदस्य तारिक हामिद कर्रा यांनी पटेल यांच्या धोरणांवर टीका करताना म्हटले की, ‘काश्मीरबद्दल त्यांची भूमिका उदासीन होती. आज जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे तो पंडित नेहरू यांच्या प्रयत्नांमुळे.’ पात्रा म्हणाले...तारिक हामिद कर्रा यांना सीडब्ल्यूसीतून काढून टाकले जाईल का? देशाची अखंडता कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले सरदार पटेल यांना बैठकीत खलनायकाच्या रुपात सादर केले गेले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला का, असा प्रश्नही पात्रा यांनी विचारला.तारिक हामिद कर्रा यांनी राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवले जावे या उद्देशाने गांधी परिवार कुटुंबाची प्रशंसा करण्यासाठी पटेल यांना कमी लेखण्याचे काम केले आहे, असेही संबित पात्रा म्हणाले.
काँग्रेस बैठकीत सरदार पटेल यांचा अपमान?; भाजपचा आरोप, विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:08 AM