मसूद अजहरचा मृत्यू? भारतीय तपास यंत्रणा लागल्या कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 10:54 PM2019-03-03T22:54:39+5:302019-03-03T22:56:30+5:30
मसूद अजहरच्या मृत्यूच्या वृत्तानंतर गुप्तहेर यंत्रणांचा तपास सुरू
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरचामृत्यू झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सोशल मीडियावरदेखील मसूद अजहरच्यामृत्यूची बातमी व्हायरल झाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.
मूत्रपिंड निकामी झाल्यानं मसूदवर पाकिस्तानमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, इतकीच माहिती आपल्याकडे असल्याचं तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. बहावलपूरचा रहिवासी असलेल्या मौलाना मसूद अजहरनं 2000 साली जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण झाल्यानं तत्कालीन वाजपेयी सरकारला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मसूदची सुटका करावी लागली होती. त्यानंतर मसूदनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्रं सुरू केली. 2001 मध्ये संसदेवर झालेला हल्ला, जम्मू-काश्मीरच्या विधानसभेवरील आत्मघाती हल्ला, पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ला आणि गेल्याच महिन्यात पुलवामात झालेला हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार आहे.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मसूद पाकिस्तानात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मसूदची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचं कुरेशी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. सोशल मीडियावर आज मसूदच्या मृत्यूची बातमी प्रचंड चर्चेत होती. ट्विटरवर #MasoodAzharDEAD टॉप ट्रेंडमध्ये होता. मात्र पाकिस्ताननं मसूदच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन केलं.
सोशल मीडियावर मसूद अजहरच्या मृत्यूबद्दल दोन दावे केले जात आहेत. मूत्रपिंड निकामी झाल्यानं 2 मार्चला मसूदचा मृत्यू झाल्याचा दावा काहींनी केला. तर काहींनी तो भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये गंभीर जखमी झाल्याचा दावा केला. एअर स्ट्राइकमध्ये जखमी झालेल्या मसूदला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.