काश्मीरमध्ये पाकिस्तानचे चार स्नायपर्स सक्रिय, गुप्तचर यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:16 AM2018-10-29T09:16:21+5:302018-10-29T11:36:47+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानचे चार स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे.
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानचे चार स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना याबाबतची माहिती दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन गटांमध्ये काश्मीरमध्ये आले. दोन गटांमध्ये एकूण चार प्रशिक्षित दहशतवादी आहेत.
We have had some casualties to our security personnel in J&K. Whether these have been done by snipers or not, we are still studying. We haven't yet recovered a sniper weapon: Army Chief Bipin Rawat in Delhi pic.twitter.com/puNcubI5pd
— ANI (@ANI) October 29, 2018
काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी जवानांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जवान जखमी झाले होते. तेव्हापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. आयएसआयने या चौघांनाही प्रशिक्षण दिल्याची माहिती मिळत आहे. स्नायपर्सकडे एम-4 कार्बाइन्स रायफल्स आहेत. स्नायपर्स नाईट व्हिजन डिव्हाईसचा वापर करून रात्रीच्या वेळी 500 ते 600 मीटर अंतरावर असून देखील लपून वार करू शकतात. त्यामुळे डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते. लष्कर आणि सुरक्षा दलांपुढे या चार स्नायपर्सना शोधून त्यांचा खात्मा करणे हे मोठे आव्हान आहे.