अंतर्गत सर्वेक्षणात काँग्रेसला ९७ ते १२६ जागा, ग्रामीण भागांत पक्षाची त्सुनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 03:36 AM2017-12-07T03:36:23+5:302017-12-07T03:36:39+5:30
गुजरातमध्ये काँग्रेसला ९७ ते १२६ जागा मिळू शकतात, असा अंदाज काँग्रेसच्या अंतर्गत गोपनीय सर्व्हेतून पुढे आला आहे. हा सर्व्हे गेल्या आठवड्यात करण्यात आला होता.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेसला ९७ ते १२६ जागा मिळू शकतात, असा अंदाज काँग्रेसच्या अंतर्गत गोपनीय सर्व्हेतून पुढे आला आहे. हा सर्व्हे गेल्या आठवड्यात करण्यात आला होता.
लोकनीती-सीएसडीएसच्या ओपिनियन पोलविषयी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणाला की, दोन राजकीय पक्षांना समान टक्के मते असतील, तर एका पक्षाला अधिक व दुसºया पक्षाला कमी जागा हे कसे होऊ शकते? टीव्ही सर्वेक्षणाबाबत काँग्रेसने कोणतेही मत व्यक्त केले नाही. काँग्रेस आपले अंतर्गत समीक्षण करत आहे आणि आमचा त्यावर विश्वास आहे, असे त्याने बोलून दाखविले. गुजरातमध्ये आपले सरकार येईल, असा काँग्रेसला विश्वास आहे. मात्र, निवडणुकीत भाजपा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून निकाल आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी भीती काँग्रेसला आहे. भाजपाच्या हेराफेरीवर लगाम लावण्यासाठी काँग्रेसने आपले सहयोगी हार्दिक पटेल व जिग्नेश मेवाणी यांच्या कार्यकर्त्यांना बुथवर तैनात करण्यास सांगितले आहे.
गुजरातच्या ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची त्सुनामी असेल, असे पक्षाला जाणवत आहे. तिथे भाजपा साफ होईल, तर शहरी भागात भाजपा-काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होईल. मागील वर्षांत काँग्रेस जिथे हरत आलेली आहे, तिथे यंदा काँग्रेस जोरदार लढत देत आहे, असे काँग्रेसच्या सर्व्हेतून आढळून आल्याचे समजते.