IMFने मोदी सरकारला दिली खूशखबर, यावर्षी ९.५ टक्के दराने अर्थव्यवस्था वाढणार, २०२२मध्ये भारत ग्रोथ रेटमध्ये संपूर्ण जगाला मागे टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:06 AM2021-10-13T07:06:16+5:302021-10-13T07:17:30+5:30
Indian Economy News: एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईचा भडका आणि कोळशाच्या टंचाईमुळे वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे.
वॉशिंग्टन - एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईचा भडका आणि कोळशाच्या टंचाईमुळे वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे. मात्र दुसरीकडे या संकटांच्या मालिकांदरम्यान, आर्थिक आघाडीवरून मोदी सरकारसाठी खूशखबर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या अंदाजानुसार २०२१ मध्ये भारताचीअर्थव्यवस्था ही ९.५ टक्के आणि २०२२ मध्ये ८.५ टक्के दराने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७.३ टक्क्यांनी घटला होता. आयएमएफच्या नव्या आर्थिक चित्रामध्ये भारताच्या विकासाच्या अंदाजाला यावर्षी जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपल्या आधीच्या अंदाजावर स्थिर ठेवण्यात आले आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या तुलनेत हा अंदाज १.६ टक्क्यांनी कमी आहे.
आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी नव्या डब्ल्यूईओनुसार २०२१ मध्ये संपूर्ण जगाचा विकास दर हा ५.९ टक्के तर २०२२ मध्ये ४.९ टक्के राहण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचा यावर्षीचा विकास दर सहा टक्के आणि पुढील वर्षातील विकासदर ५.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. या पूर्वानुमानांनुसार चीनची अर्थव्यवस्ता २०२१ मध्ये आठ टक्के आणि २०२२ मध्ये ५.६ टक्के दराने वाढू शकते. आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, त्यांच्या जुलै महिन्यामधील अंदाजाच्या तुलनेमध्ये २०२१च्या जागतिक वृद्धीच्या अनुमानाला किंचित स्वरूपात संशोधित करून ५.९ टक्के करण्यात आले आहे. तसेच २०२२मध्ये ते ४.९ टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.