5G मुळे देशात इंटरनेट क्रांती, मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर - पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:33 PM2022-10-01T12:33:43+5:302022-10-01T12:40:07+5:30
1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस (India Mobile Congress) कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेची सुरूवात केली.
'आज 130 कोटी भारतीयांना 5G च्या रूपाने एक अद्भुत भेट मिळत आहे. 5G नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस (India Mobile Congress) कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेची सुरूवात केली. यावेळी ते बोलत होते.
5G Launch in India: आता 'बफरिंग' विसरा... इंटरनेट होणार सुपरफास्ट; भारतात 5G चा शुभारंभ
याअगोदर देशाला बाहेरुन मोबाईल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाईल निर्यात करत आहे. जगात भारत मोबाईल निर्मिती करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करुन दाखवले आहे, असंही मोदी म्हणाले.
Digital India's success is based on 4 pillars incl cost of device, digital connectivity, data costs & digital first approach. We worked on all of them: PM Modi pic.twitter.com/b29mSZC7km
— ANI (@ANI) October 1, 2022
'21 व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे. 5G तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. नवा भारत हा फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत भारत सक्रिय भूमिका बजावेल. भविष्यातील या तंत्रज्ञानात भारताची मोठी भूमिका असेल. 2G, 3G, 4G च्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता. पण 5G ने भारताने एक नवा इतिहास रचला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकारने घरोघरी वीज पोहोचवण्याची मोहीम सुरू केली होती, जसे हर घर जल अभियानातून प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्याच्या मिशनवर काम केले होते. तसेच उज्ज्वलाच्या माध्यमातून गरीबातील गरीबांच्या घरात गॅस सिलिंडर पोहोचवले. त्याचप्रमाणे आमचे सरकार सर्वांसाठी इंटरनेट या ध्येयावर काम करत आहे. मी पाहिले आहे की, देशातील गरीब लोक देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी नेहमीच पुढे येतात. आता तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने लोकशाही बनले आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.