बंगळुरू - देशात मार्च अखेरपासून सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे परराज्यांत अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी, भाविक आणि पर्यटक यांना आपापल्या राज्यात बसने घेऊन जाण्याची मुभा केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी दिली आहे. यामुळे परराज्यांत अडकून पडलेल्या या लाखो लोकांना संबंधित राज्ये परत घेऊन येण्याची व्यवस्था करू शकतील. मात्र, राज्यातील स्थलांतरीत नागरिकांचं काय हा मोठा प्रश्न तसाच आहे. आता, या प्रश्नावर कर्नाटक सरकारने पुढाकार घेतल्याचे दिसून येते. कर्नाटकचे मंत्री जेसी मधुस्वामी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसह अनेक मोठ्या शहरांत तसेच काही राज्यांत अडकून पडलेल्या मजूर आणि विद्यार्थ्यांचे एका महिन्यापासून आपापल्या गावी जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण लॉकडाउन आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती यांमुळे रेल्वे व आंतरराज्य बससेवा पूर्णत: बंद आहे. त्यामुळे विशेषत: मजूर व विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. यात लहान मुले तसेच वृद्धांचे विशेष हाल होताना दिसून आले आहेत. तसेच त्यांची कुटुंबेही चिंतित आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांची त्यांची मोठी सोय होणार आहे. यासंबंधीचे सविस्तर पत्र केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे. त्यात या मंडळींना नेण्या-आणण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. लॉकडाउनमुळे देशभरातील अनेक शहरांमध्ये अडकून पडलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना आपल्या मूळ राज्यात कसे आणायचे, याबाबत राज्यांमध्ये चर्चा सुरू होती. काही राज्यांनी यासाठी विशेष वाहनांचीही सोय केली होती. मात्र, कर्नाटकने यापुढे एक पाऊल टाकत आपल्या राज्यातच, पण विविध जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी आणि स्थलांतरीत नागरिकांची घरवापसी करण्यासंदर्भात विचार सुरु केला आहे. त्यासाठी, आंतरराज्य प्रवासाची सोय कर्नाटक सरकारकडून करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने या अटींसह दिलीय परवानगी
परराज्यांत अडकलेल्यांना परत नेणे/आणणे यासाठी राज्यांनी निश्चित पद्धत ठरवावी आणि त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची नेमणूक करावी.प्रत्येक राज्याने त्यांच्याकडे अडकलेल्या परराज्यातील लोकांची नोंदणी करावी. यानुसार राज्यातच अन्य जिल्ह्यांमध्ये अडकलेल्यांचीही वाहतूक करता येईल. परराज्यात ने-आण करायची असेल तर दोन्ही राज्यांनी आपसांत चर्चा करून कार्यक्रम ठरवावा. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायच्या व्यक्तीचे आधी स्क्रीनिंग करण्यात यावे व त्याला कोरोनाची लक्षणे नसतील तरच जायला परवानगी दिली जावी. बसने जातानाही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात यावे. तसेच सर्व बसेस सॅनिटाइझ कराव्यात. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर पुन्हा अशा लोकांची तपासणी करून त्यांना सरळ घरी जाऊ द्यायचे की क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवायचे हे संबंधित राज्याच्या सक्षम अधिकाऱ्याने ठरवावे.