आता 'शुक्र'ही इस्रोच्या कक्षेत येणार; लवकरच यान पाठवण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 10:25 AM2022-05-05T10:25:06+5:302022-05-05T10:27:23+5:30
सूर्यमालेतील सर्वात उष्ण असलेल्या शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचं इस्रोचं लक्ष्य.
नवी दिल्ली : चंद्र व मंगळावरील मोहिमेनंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) आता सूर्यमालेतील सर्वात उष्ण असलेल्या शुक्र ग्रहावर डिसेंबर २०२४ मध्ये अवकाश यान पाठविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
यासंदर्भात इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. शुक्रावर आखावयाच्या अंतराळ मोहिमेला नेमका किती खर्च येईल, तसेच त्यामध्ये तंत्रज्ञानविषयक कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करावा लागेल, याचा प्रकल्प अहवाल तयार केल्याचे एस. सोमनाथ यांनी या बैठकीत सांगितले. या मोहिमेचे भारताला उत्तम फलित मिळणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
या मोहिमेचा फायदा काय?
- शुक्राच्या पृष्ठभागाखाली तसेच तेथील वातावरणात सल्फ्युरिक ढगांच्या आच्छादनाखाली कोणते घटक आहेत, याचा शोध इस्रो घेणार आहे.
- त्याकरिता शुक्र ग्रहाची परिक्रमा करण्याकरिता इस्रो एक यानही तयार करीत आहे. हे यान शुक्राभोवती १०० ते १५० वेळा घिरट्या घालणार आहे.
- शुक्र ग्रहावर असलेले जिवंत ज्वालामुखीचे प्रदेश व लाव्हारसाचे प्रवाह, तेथील पृष्ठभागाची रचना, वातावरणाचा अभ्यास भारत या मोहिमेत करणार आहे. सौरवाऱ्यांचा या ग्रहावर होत असलेला परिणामही अभ्यासण्यात येईल.
२०२४ कशामुळे?
या कालावधीत पृथ्वी व शुक्र ग्रहाची भ्रमणस्थिती अशी असेल की, शुक्राचे अवकाश यानाद्वारे अधिक चांगले निरीक्षण करता येईल. त्यासाठी अवकाश यानाला किमान प्रमाणात इंधन लागणार आहे. या दोन ग्रहांबाबत अशी भ्रमणस्थिती २०३१ मध्ये पुन्हा येण्याची शक्यता आहे.
भारताकडे अंतराळ संशोधनासाठी असलेली क्षमता लक्षात घेता, शुक्र ग्रहावरील मोहिमेची तयारी दोन वर्षांच्या काळात करता येईल. या ग्रहावर डिसेंबर २०२४ मध्ये अंतराळ यान पाठविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
- एस. सोमनाथ