बडोदा - गतवर्षी अमरनाथ यात्रेला गेलेल्या गुजराती भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी यात्रेदरम्यान बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. जे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून यात्रेस जातात त्यांच्यासाठी बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे अनिवार्य असेल. मात्र विमान आणि रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना हा नियम लागू करण्यात आलेला नाही. गुजरातमधून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला जात असतात. या यात्रेसाठी गुजरातमधून सुमारे पाच ते सात हजार भाविक नोंदणी करून जात असतात. तर सुमारे 35 हजारांहून अधिक भाविक नोंदणी न करताच यात्रेला जातात. सध्या खाजगी टूर ऑपरेटर्सकडून अमरनाथ दहा हजार रुपये आकारण्यात येतात. मात्र बुलेटप्रुफ जॅकेटची किंमत 12 हजारांहून अधिक असल्याने यात्रेकरूंना अधिकचा भूर्दंड पडणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने केलेल्या या नियमाबाबत खासगी टूर ऑपरेटर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने केलेल्या नियमावलीत टूर ऑपरेटर्सनी यात्रेकरूंना बुलेटप्रुफ जॅकेट उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच या नियमाची अंमलबजावणी केली नाही तर सदर टूर कंपनीला परवाना दिला जाणार नाही, अशीही तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. तसेच अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा चालक हा 50 वर्षांहून अधिक वयाचा नसावा अशीही तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. या नियमावलीवर टीकास्र सोडताना अखिल गुजरात टुरिस्ट व्हेईकल ऑपरेटर्स फेडरेशनचे चेअरमन हरी पटेल म्हणाले, "बुलेटप्रुफ जॅकेट खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसतात. मग ते आम्ही खरेदी करायचे कसे? खाजगी टॅक्सी, ट्रेन आणि विमानातून प्रवास करणाऱ्यांना हा नियम लागू नाही. मात्र आम्ही या नियमाचे पालन करण्यास तयार आहोत. पण सरकारने त्यासाठी योग्य कारण दिले पाहिजे."
अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 9:13 AM