नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षपदावरून दिल्लीत पक्षातंर्गत अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
एका मराठी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानूसार, राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरला. त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहार निवडणुकीच्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्षात नेतृत्व आणि व्यापक संघटनात्मक बदल व्हावा यासाठी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहलं होतं. आता पत्र लिहणाऱ्या त्या नेत्यांशी सोनिया गांधी स्वत: चर्चा केल्याचं समजतय. या नेत्यांची शनिवारी दिल्लीत सोनिया गांधींच्या 10 जनपथ या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्या सहित काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला सक्रिय अध्यक्षाची गरज आणि व्यापक संघटनात्मक बदल करावा अशी मागणी केली होती. यावर काही काँगेस नेत्यांनी गांधी परिवाराच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती.
99.9 टक्के पक्ष कार्यकर्त्यांना अध्यक्ष म्हणून राहुल गांधीच हवेत- काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला
काँग्रेसचं इलेक्टोरल कॉलेज, ऑल इंडिया काँग्रेस समितीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य मिळून योग्य व्यक्तीची निवड पक्षाध्यक्ष म्हणून करतील. राहुल गाधी हेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, ही माझ्यासहीत पक्षातील 99.9 टक्के लोकांची इच्छा आहे, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.