- हरीश गुप्ता ।नवी दिल्ली : चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला असला तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत तो स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेबदल करताना नितीन गडकरी यांना रेल्वे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांना सुरुवातीलाच वाहतूक व रेल्वेमंत्री केले जाणार होते. पण तेव्हा तसे झाले नाही. मात्र आता पायाभूत सुविधांचे मिळून एकच मंत्रालय करण्याचा विचार सुरू आहे.रेल्वचा अतिरिक्त कार्यभार अन्य मंत्र्यांकडे देणे योग्य ठरणार नाही, असे पंतप्रधानांना वाटत असल्याचे कळते. रेल्वेसाठी पूर्णवेळ मंत्रीच असायला हवा. त्यामुळे खातेबदल व मंत्रिमंडळ विस्तार करतानाच, मोदी आवश्यक तो निर्णय घेतील, असे कळते.प्रभू यांच्या राजीनाम्याविषयी अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, पंतप्रधानच त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील. संबंधितांनी जे घडले, त्याची जबाबदारी स्वीकारणे अपेक्षितच असते, असे सांगून, त्यांनी प्रभू यांचा राजीनामा स्वीकारला जाण्याचे सूचित केले. रेल्वेला चांगला प्रशासक मिळावा, या हेतूनेचे पंतप्रधानांनी प्रभू यांना त्या खात्याचे मंत्रीपद दिले होते. या खात्याची सूत्रे स्वीकारली, तेव्हाच रेल्वेतील सावळागोंधळ कसा सावरू, असा सवाल त्यांनी केला होता.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा राजीनामा स्वीकारणे अवघडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:33 AM