नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला 13,000 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरेव्यापारी नीरव मोदीनं भारतवापसी करण्यास नकार दिला आहे. भारतात आल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षेच्या कारणास्तव मी भारतात येऊ शकत नाही, असे नीरव मोदीनं Special PMLA Courtला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. तसंच, मी काहीही चुकीचे केलेले नाही, अशा उलट्या बोंबाही नीरव मोदीनं मारल्या आहेत.
यापूर्वीही नीरव मोदीने सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता. ईडीशी साधलेल्या संवादात तो म्हणाला होत की, ''मला मिळणाऱ्या धमक्या आणि सुरक्षेविषयीच्या कारणांमुळे मी भारतात येऊ शकत नाही. मी होळीच्या वेळी भारतीय लोकांकडून माझे पुतळे जाळण्यात येत असल्याचे पाहिले आहे. मला कर्मचारी, घर मालक, ग्राहक आणि अन्य एजन्सींकडून धमक्या देण्यात येत आहेत. एवढ्या धमक्या मिळत असल्याने मी भारतात येऊ शकत नाही''.
दरम्यान, नीरव मोदी व मेहुल चोकसी यांना कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करणाऱ्या पंजाब नॅशनल बॅँकेच्या तत्कालिन आठ अधिका-यांसह दहा जणांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) 18 डिसेंबर 2018 रोजी अटक केली. बॅँकेच्या ब्रेडी हाऊस शाखेतून बेकायदेशीरपणे ‘अंडर टेकीग’चे पत्र देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली होती, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अमर जाधव, सागर सावंत, मुख्य व्यवस्थापक बिच्चू तिवारी, व्यवस्थापक यशवंत जोशी, शाखा प्रमुख संजय प्रसाद, अधिकारी प्रफुल्ल सावंत, व मुख्य अंतर्गत लेखापाल मोहिदर शर्मा, ईश्वरदास अगरवाल व आदित्य रसीवसा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अगरवाल व आदित्य हे चोक्सीच्या कंपनीतील संचालक आहेत. तर उर्वरित आठजण हे पीएनबी बॅँकेचे तत्कालिन कर्मचारी आहेत. सर्वाना २१ डिसेंबरपर्यत सीबीआयची कोठडी मिळाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी निवृत्त कर्मचारी गोकुळनाथ शेट्टी, एक खिडकी योजनेतील आॅपरेटर मनोज खरात यांना अटक झालेली आहे.
(नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्याची आठ महिने आधीच होती माहिती!)
बहुचर्चित पंजाब नॅशनल बॅँकेच्या घोटाळ्यामध्ये मार्च 2017 मध्ये मेहुल चोक्सी व नीरव मोदीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अन्य बॅँकेतून कर्ज मिळवून देण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकींग ( एलओयू) देण्यात बॅँकेच्या शाखेतील तत्कालिन कर्मचा-यांना सहभाग होता. त्यांनी चांद्री पेपर्स व अॅलिड प्रोडक्ट्सला पुरविले होते. एप्रिल 2017 मध्ये त्यांनी ही पत्रे बेल्जियमच्या एसबीआय बॅँकेच्या नावे दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी रक्कम उचलली आणि त्याची परतफेड न केल्याने त्याचा बोजा पीएनबी बॅँकेवर टाकण्यात आला आहे.